एक पत्रकथा..


१३ जून १९९१

आदरणीय (की प्रिय?)__,

संबोधन काहीही वापरले तरी पुढे नाव काय लिहू? कारण, "अस्तित्व" हे एखाद्या माणसाचं नाव असतं ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही.

असो.

हे पत्र सदर तारखेला लिहीलं असलं तरी, ते तुमच्या पर्यंत कधी पोहोचेल किंबहुना पोहोचेल का, असा प्रश्न आहे, आणि समजा पोहोचलेच तर एक प्रसिद्ध लेखक, हे पत्र वाचून किमान पोचपावती तरी देतील का, हा त्याहून मोठा प्रश्न आहे.

तुमच्या लिखाणाने कधी मला आपलसं केलं, कळालं नाही, मात्र तुमचं प्रसिद्ध झालेलं प्रत्येक पुस्तक माझ्या संग्रही आहे- प्रत्येक! तुमचं हर एक पुस्तक वाचल्यावर मला त्याबद्दल जे वाटलं ते मी एका डायरीत लिहीत आलेय... तुमच्या एका पुस्तकावर माझी २ पानं! आता ती डायरी पूर्ण भरलीये, ह्या पत्रासोबत पाठवतेय- निदान डायरीची पोहोच कळवावी.

गम्मत अशी आहे, इतकं प्रगल्भ लिहिणार्‍या आपला कुठल्याही पुस्तकावर ना पत्ता आहे, ना खरं नाव माहिती आहे - हे कळत असूनही माझी डायरी मी पाठवत आहे- सारंच अगम्य!!

शक्कल अशी लढवली- की तुम्ही तुमची पुस्तकं फक्त एकाच प्रकाशनामार्फत प्रसिद्ध करवता, त्यांचे एक ऑफिस इथे जालन्यात आहे,

आमच्या घरात एक घरगडी आहे, 'काका" म्हणतो त्याला आम्ही, खुप जुना, म्हातारा माणूस, त्याला विश्वासात घेऊन हे पत्र नि डायरी त्या प्रकाशन ऑफिसमधे पाठवत आहे....! प्रकाशक तुमच्या पर्यंत हे (न उघडता) पोहोचवतील अशी आशा आहे, त्यांना तसे विनंती वजा पत्रही काकांच्या हाती पाठवत आहे.

पुढील पत्रव्यवहार तुमच्या उत्तरावर विसंबलेला....

-आपली विनम्र वाचक
निर्मयी
(माझा पत्ता एन्व्हलोपच्या मागे नमूद केला आहे)

------------------------------------------------------------------------------

२५ ऑगस्ट १९९१

नमस्कार निर्मयी,

तुमचे पत्र, डायरी मिळून बरेच दिवस झाले. डायरी खरोखर "एका वाचकाची भेट" म्हणून कायम जपून ठेवावी अशी आहे.

आभार...

-अस्तित्त्व.

------------------------------------------------------------------------------

१ सप्टेंबर १९९१

नमस्कार सर,

आपण उत्तर पाठवलत, मी धन्य झाले.

फारच मोजून शब्द लिहिलेत पत्रात... पुस्तकं जशी भरभरून असतात तसं नव्हतं, पण आलं हे ही नसे थोडके!

कमाल वाटली, तुमच्या आलेल्या एन्व्हलोपवर ना तुमचा पत्ता आहे, ना जेथून ते आलंय त्या गावचा ठप्पा!! म्हणजे तुम्हीही त्या प्रकाशकांमार्फतच ते माझ्या घरी पाठवलं असावं असा कयास आहे. मी घरी नसल्यामुळे काकांनीच ते घेतलं आणि माझ्यापर्यंत पोहोचवलं...

"नाते- संबध" ह्या विषयावर गहन लेखन करणारे आपण, साध्या वाचकाशी पत्रव्यवहार करताना, इतके सजग कसे? हे मनात घोळत राहिलं.

तुमचं असं अगम्य वागणं तुमच्याबद्दलची ओढ वाढविणारं आहे- "प्रत्येक ओढीने नातं साकारलं जरी गेलं तरी ते टिकतं किती, हे वेळच ठरवितो" हे तुमच्याच "उन्मत्त" पुस्तकातील माझं आवडीचं वाक्य!!

असो, उगाच भरकटत जात नाही, कामाच्या पसार्‍यात वेळ मिळालाच तर उत्तर द्यावे.

ह्या पत्राचा प्रवास सुरू-- काका, प्रकाशक आणि शेवटी अस्तित्व!!

-आपली विनम्र वाचक
निर्मयी

------------------------------------------------------------------------------
२९ सप्टेंबर १९९१

नमस्कार निर्मयी

उत्तर द्यावे की न द्यावे ह्या द्विधेत महिना गेला उगाच माणस जोडत सुटायचा स्वभाव नाही माझा.
माणसं ओळखण्यात अनेकदा चुकलोय, आता सावध असतो. माझी ओळख देणे न देणे हा माझा प्रश्न आहे, सर्वस्वी!!

हे पत्रही मी प्रकाशकांमार्फतच पाठवत आहे, माझा पत्ता कुणालाही देऊ नये असा त्यांना स्पष्ट निरोप आहेच.

नाते संबंधांवर लिहीतो, कारण खूप जवळून डोळसपणे सारं पाहतो... नात्यांना जोडायला, क्षण पुरतो -तोडायला क्षणाचा हजारावा हिस्सा, टिकवायला मात्र जन्माचा ध्यास!!

आणि, मी निर्मयीला उद्देशून लिहितो, पत्र मात्र "सायली जगतापे" हया नावाने जातात... हे ही अगम्य, नाही का??

-अस्तित्व

------------------------------------------------------------------------------
इथून पुढे-१

-------------------------------------------------------------------------
१३ ऑक्टोबर १९९१

अरे बापरे...
चिडलात? मला वाटतं माझ्या सहज लिहीण्यात तुमची सलती नस दुखावली गेलीये. क्षमा असावी.

तुमच्याशी बोलताना तुमच्या गुढतेचा ताळतंत्र समजायचाय मला अजून.

तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात नेमकं काय चालतं ह्यात मलाही स्वारस्य नाही, पण गेली अनेक वर्षे मी ज्या व्यक्तीला पुस्तकांतून ओळखते, ती व्यक्ती कधीही लोकांसमोर येत नाही, पुरस्कार समारंभांना नाही, त्या व्यक्तीचा पत्ता लोकांना माहिती नाही, त्याचं नावही तो सांगत नाही- आश्यर्य वाटणारच.
मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची जी एक वाट सापडली आहे, ती तुमच्या हजार चाहत्यांनाही गवसली असेलच ना!
मग एकतर तुम्ही सार्‍यांनाच पत्रोत्तर देत नसाल किंवा असे तुटक उत्तर दिल्यावर वाचकच घाबरून पुढचा पत्रव्यवहार करत नसावा.

अस्तित्व (ह्याच नावाने उल्लेखायची वेळ आलीये),
सायली जगतापे मीच!
'निर्मयी' हे मला आवडणारं नाव, म्हणून ते "तुमच्याशी" बोलताना वापरलंय!
तुमच्या लेखणीने मला आपलंस केलय, इतकं की पहिल्या पत्राच्या सुरुवातीला 'प्रिय' म्हणताना चरकले नाही.

प्रत्येक कलाकाराला उद्विग्नतेचा शाप असतोच, ही माझी धारणा खरी ठरवू नका- इतकंच म्हणेन.

जमलंच तर उत्तर द्या. वाट पाहतेय. तुम्हाला निदान मी स्त्री बोलतेय हा विश्वास तरी आहे, माझा पत्ता तुमच्याकडे आहे- कधीही येऊन तुम्ही चौकशी करूच शकता, पण मला उत्तरं नेमकं कोण देतंय, मलाही माहिती नाही- तरीही पत्र पाठवतच आहे.

-आपलीच विनम्र
निर्मयी

(गेल्या आठवड्यात बरेचदा डॉक्टरांकडे जाणे येणे करण्याच्या गडबडीत पत्रोत्तराला उशीर झाला आहे)

-------------------------------------------------------------------------------
२८ डिसेंबर १९९१

निर्मयी,
पत्र भेटून बरेच दिवस झालेत, बहुधा महिन्याच्या वर! पण टेबलावर पडून असलेला तो एन्वलोप उघडावाच वाटत नव्हता... आज उघडला आणि आजच उत्तर देतो आहे.

मला मित्र नाहीत.
मला कुटुंब नाही,
मला माणसांत भटकायला आवडत नाही.

दोन व्यक्ती जवळ आल्या की "नातं" बनतं आणि आयुष्याचे नवे व्याप, ताप, संताप, वैताग सुरू होतात...
त्यातले सुंदर क्षण वेचून ठेऊन वेगळे काढावेत म्हटलं तरी ते कुजलेल्या अपेक्षांमधून वेगळे असे काढता येतच नाहीत, त्यांनाही कुजका वास लागलेला असतो.

मला नातीच नको आहेत.

तू उत्तर नाही दिलंस तरी चालेल.
माझी तर्‍हा ही अशीच आहे.

-अस्तित्व.
--------------------------------------------------------------------------------

६ जानेवारी १९९२

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

"नाती- ह्यांची नावं ठरवली की अपेक्षांचा जन्म होतो" तुम्हीच लिहीलेलं आणखी एक वाक्य!

देवाने निर्मिलेल्या दोन व्यक्ती, "फक्त व्यक्ती" म्हणूनच का जगत नाहीत? हा मला पडलेला कायमचा प्रश्न...

प्राण्यांमधे पण असतील का मामा, काका, भाचा, पुतणी, आईच्या जावेची चुलत बहिण, मावशीची ननंद, नातू, आजोबा वगैरे?

आपणही प्राणीमात्रच! मात्र बुद्धीजिवी- म्हणून ह्या गोष्टींन्ना जन्म द्यायचा, निव्वळ द्यायचा नाही ह्यांनाच घट्ट अतिघट्ट बिलगायचं... मग "संस्कार" नावाचा आणखी एक रोग!

असे-असे वागले- तू सर्वोत्तम
थोडे कमी पडलात- तू बरा
थोडे आणखी कमी- गेलेली केस!!!

असे सर्वसाधारण ठोकताळे.

तरी गम्मत काय- पुरूषांना प्रत्येक गोष्टीत एक अलिखीत पळवाट, स्त्रिया त्या वाटेवर पदर डोक्यावर घेऊन जरी दिसल्या तर तिची गावभर बभ्रा!! -ह्या आपणच स्त्री-पुरूष जातीला दिलेल्या "मर्यादा" म्हणे- मर्यादा - मला हा एक हास्यास्पद प्रकार वाटतो,
का? कळेलच (जर पत्रव्यवहार राहिलाच अबाधित तर)

तर सांगायचं असं,
की तुमचंच उदाहरण घेऊ या,
तुम्ही जगभरातली नाती अनुभवून- उपभोगून, "मग" त्यांना कंटळला असावात, आता इतके की तुम्हांला वीट आलाय- माणसं म्हटली की शिसारी आलीये...!! कदाचित- कदाचित ही उदासीनता तुमच्यात काही काळापुरती असावी- "मनुष्य समाजशील प्राणी आहे" हे होतं वाटतं ना शाळेत शिकताना... हे ही मानवानेच ठरवलय बरं!!

तुमचीच विनम्र,
निर्मयी
------------------------------------------------------------------------------
इथून पुढे-२

-------------------------------------------------------------------------

२४ फेब्रुवारी १९९२

निर्मयी, निर्मयी....
मी हसलोय तुझं पत्र वाचून... नुसता नाही गडबडा हसलोय...!!
माझ्या ह्या घराच्या भिंतीनांही ते चमत्कारिक वाटलं असेल.. 'हसणे' हा मानवी अविष्कार पार विस्मृतीत गेला असेल त्यांच्याही!!!

माझा सेक्रेटरी धावत आला आत, मानवप्राण्यांपैकी सबंध ठेवलेले हे एकच पात्र माझ्यासोबत आहे.. आमच्यात 'संवाद' असा घडत नाही कधीच, तो माझे सर्व व्यवहार पाहतो- लेखन, प्रकाशन, पुरस्कार इ.इ., बावचळला तो, त्याला वाटलं म्हणे मी आज टेपरेकॉर्डर्वर "हास्य" ऐकतोय की काय....
पुन्हा माझा नॉर्मल झालेला चेहरा पाहून निघून गेला बिचारा- कुणाची पुण्याई म्हणून आजही हा माणूस मला चिकटून आहे, ते देव जाणो.

असो.

तुला वाटेल हा माणूस लहरी आहे, मनात येईल तेव्हाच पत्र पाठवतो- ते खरे आहे!!

ह्यावेळी मात्र काही इतर कारणामुळे उशीर झालाय, (लहरीपणा प्रकारामुळे नव्हे.)
तुला भटकायला आवडतं? माणासांच्या बाजारात नाही, निसर्गात??

तू माझी प्रवासवर्णनं, निसर्गवर्णनं का वाचली नाहीस आजवर? खरे पाहता, त्या पुस्तकांना पण बर्‍यापैकी नावाजलं गेलंय- की कदाचित तूच "नाती" ह्या विषयाच्या प्रेमात आहेस?

मी माझी मोटरसायकल घेऊन, पाठीला एक होल्डोल अडकवून भटकायला गेलो होतो- निसर्ग जगायला गेलो होतो... बर्‍याचदा जातो- मनावर पुटं चढली की निसर्गाचाच कुंचा वापरतो.

येताना जालना- औरंगाबाद करत पुढे आलो. क्षणभर वाटलं जालन्यात आल्यावर, पत्ता पाठ आहे, येऊन भेटावं तुला- पण लगेच माझ्यातला मी फणकारला- पुन्हा ओळख, भेटी, नातं नि अपे़क्षा?
दुसर्‍या क्षणीच अगदी मी पुढचा गिअर टाकला अन अ‍ॅक्सिलेटर पिळला...

कधी माझे पत्र येण्यास बंद झालेच ना तर समजून घे, एकतर पत्रव्यवहाराचा उबग आलाय किंवा तुझ्याकडे आकर्षित होऊन नवे व्याप वाढू नयेत म्हणून पूर्णविराम लावलाय- विचित्र ना? कारण तुझ्याकडे आकर्षित व्हायला तू नक्की कोण, साठीतली की पंचविशीतली हे ही कळत नाहीय्ये.. आणि प्रेमात पडायचा तिटकारा आलाय... कुठल्याही क्षणी आता नव्या नात्यात स्वतःला गोवायची माझी तयारी नाही- सार्‍या पाशांतून स्वतःला सोडवायला मी खूप झटलोय, भाजलोय- तोच मूर्खपणा आता नाही.

हं..
तर तुझं पत्र वाचून हसलो, कारण...

मी गेली ५ वर्षे "एकटा" राहतोय- एकटा.. खरंय सारी नाती उपभोगून झाल्यावर एकटा! आणि तू हे ताडलंस.. माणसाची लेखणी त्यालाच चार लोकांसमोर आणते, नुसतं आणत नाही तर त्याचीच चिरफाड करते कदाचित.. माझ्या ह्या स्थितीला हसलो.

तुझ्याशी पत्रव्यवहार चालू ठेवण्याचं कारण म्हणजे- तुझे विचार!
स्त्रियांना स्वतंत्र विचारसरणी असते हे मी जाणतो- पण; तुझ्या विचारांतला स्पष्टपणा भावतो.

काय म्हणालीस मागच्या पत्रात- पळवाट- पुरुषांची पळवाट- अलिखीत- पदर डोक्यावर घेतलेली स्त्री दिसली अक्षरशः.... संस्कार नावाचा रोग- हास्यास्पद मर्यादा- इन्ट्रेस्टींग!!

तुला काय हवय गं मग?
माणसांनी प्राण्यांसारखं वागायला- एक नर- एक मादा! बास?

आणि तू स्वतः मर्यादाशील स्त्रीच वाटते आहेस पत्रांतून... ते काय आहे?

परवा परतताना वेरुळच्या लेण्यांमधे डोकावलो, त्या लेण्यांवरून माझी मेलेली नजर फिरताना कसंनुसं झालं, तिथे काय आवडलं माहिती आहे? गहन शांतता... गुहांमधला गूढ गारवा, गार अंधार...!!
जाणवलं पुन्हा- एकटं असणं चांगलं असतं.. आणि तू म्हणतेस, कदाचित ही उदासीनता काही काळापुरती असावी...? नाही निर्मयी, ती मी मिळवलीये- आत्म्याने स्विकारलीये..!!

-अस्तित्त्व.

------------------------------------------------------------------------
३ मार्च १९९२

नमस्कार! (अजूनही नाव माहितीच नाही आपलं)
एक मुद्दा स्पष्ट करते- मग संवाद सुरू करेन.
हा पत्रव्यवहार म्हणजे मी माझ्या साचलेल्या विचारांना वाट करून देण्याचं एक माध्यम समजत आहे.
क्लिष्ट विचार ताकदीच्या माणसासमोर व्यक्त झाले तर आशय समजाविण्याचा आटापिटा नसतो.
आपल्यासोबत कुठल्याशा नात्यात गोवलं जाण्याची ना माझी पात्रता आहे ना "इच्छा"!!

तुमची भटकंती वाचून छान वाटलं,
आणि विरक्ती वाचून आश्चर्य!

सर्व काही मनममुराद उपभोगल्यानंतर "आता मला उबग आलाय" म्हणणे हास्यास्पद ना?
मला ते सध्याच्या मार्केटमधील भोंदू साधूंसारखंच वाटतं, संसार करून घ्यायचा- तिकडे मुलं उच्च महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, आणि आपण "विरक्तीचा" आव आणून गावोगाव प्रवचनं करित फिरायचं- ब्रह्मचर्येवर!! शिष्य ब्रह्मचारीच हवेत- ही ही मागणी!!

मी खरोखर स्तिमीत झाले, तुमच्या आत्ताच्या पत्रानंतर की, तुम्ही तुमच्या "अर्पण" पुस्तकातल्या ह्या ओळी- प्रत्यक्षात जगलात..?

"नाती जुनी नसतात होत,
संदर्भ बदलतात..!
'हिरवेपणा' टिकवण्याचा
प्रयत्न संपला, की
नातं टांगून ठेवावं!
सोबत घेऊन फिरण्यात अर्थ कसा उरतो...?
जीर्णता दिसून येते"

तुम्ही खरंच सारी- सारी नाती ठेवून दिलीत टांगून, कदाचित स्वतःच्या घराच्या नाही... निरोपाच्या भिंतीवर? म्हणजे शोभेलाही घरात अडकवून नाही ठेवल्यात, जीर्ण झाली होती ना सारी..!!!

रागावू नका, परखड व्यक्तव्यावर.... पण तुम्ही थेट 'नाती' लिहिता, त्या आधी "माणूस" समजलाय का?
हाच प्रश्न गेली अनेक वर्षे मला सतावत होता- आणि "हाच प्रश्न" आहे आपल्या ह्या पत्रव्यवहाराचं मूळ कारण...
तुमचं लिखाण, नात्यांतील उलाढाल, नाजूक मांडणी हे सारं वाखाणणीय आहे, हे सारं तुमच्याकडे असलेले पुरस्कारच सांगतात... पण हा प्रश्न मात्र टक्क जागा राहतो माझ्या मनात, तुमच्या प्रत्येक पुस्तकाची पारायणं करताना..

तुम्ही विचारलंत मला काय हवंय, प्राण्यांसारखेच जगायला का, नर- मादा वगैरे.
तुम्ही निसर्ग जगता ना? मग त्याला अंडर एस्टीमेट का करताय?

तुम्हांला काय वाटतं व्यभिचाराचं रण माजेल? इथे प्राण्यांमधेही मादा आपला नर स्वतः निवडते. तिला ती समज तुम्ही- मी नाही, ह्या निसर्गानेच दिलेली आहे.
पण इथे, जन्मलेल्या प्रत्येकाने मोठं कसं व्हायचं हे त्याचे माता-पिताच ठरविणार...आपण सारे महारोगी आहोत- 'संस्कार' रोगाने पिडीत!!

प्रत्येकाला "त्याची/तिची" अशी स्वतःची विचारसरणी आपण लाभूच देत नाहीत, संस्काराचं गाठोडं ठेवतो डोक्यावर आणि रस्ताही देतो आखून. बरं दिलेलं गाठोडं सदोष की निर्दोष हे ठरविणारं तसं पाहता कुणीच नाही- गाठोडं खाली नाही ठेवायचं एवढीच अट- ह्या पिढीने पुढच्याच्या आणि त्या पिढीने पुढ्याच्याच्या डोक्यावर देत चला, देत चला....

हसू येतय?
का?
हे विचार करणारी- मी एकटीच म्हणून? बरोबर आहे, माझ्यासारखा विचार करण्यार्‍याचा गट हवा किंवा तो पटणार्‍यांचा तरी. आज समाज- स्टेटस ह्या नावाखाली- हा मुलभूत विचार कानी पडला तरी डोक्यात शिरणार नाही, कारण डोक्यावर ते ओझं आहे!!!

मी मर्यादाशील आहे असं म्हणालात- हो आहे. हे सारे असे विचार असूनही मी आहे आणि मी ते तशी असल्यामुळेच खूप भोगलंय आणि आज ह्या अवस्थेत तुमच्यापुढे उभी आहे.

असो.

पुढील महिनाभर माझ्याकडून पत्रव्यवहारत खंड पडेल... आपण ह्या पत्राचे उत्तर देऊन ठेवावे.

आपली नम्र,
निर्मयी
(बरं झालं येऊन भेटला नाहीत! नाहीतर पुढची पत्र झालीच नसती.)
--------------------------------------------------------------------------------

१२ मार्च १९९२
निर्मयी,
तुझ्या पत्राने सुन्न झालो. गेल्या ५ वर्षंत निसर्गाने सोडून कुणीही असा सून्नपणा पदरी टाकला नसेल माझ्या.

मर्यादा जपतांना स्त्रियांची घूसमट खरेच इतकी होते का? आणि तू दिलेला नवा विचार- ह्या मर्यादा कुणा समाजशील माणसाने बनविलेल्या- रचलेल्या- लादलेल्या!!!

मागेही एकदा डॉकटरांकडे येणे- जाणे ह्यामुळे पत्रोत्तराला उशीर होतोय असे म्हणाली होतीस, आता महिनाभर नाही आहेस, सगळे ठीक ना?

(आधी कधी हे विचारले नाही, कारण उगाच तुझ्यात अडकायचं नव्हतं, आता विचारतो आहे, कारण "एकमेकांत अडकायचं नाही" हा दोघांमधील ठराव आहे)

उत्तराच्या अपेक्षेत,
-अस्तित्व.

--------------------------------------------------------------------------------
इथून पुढे-३

--------------------------------------------------------------------------------
२० मार्च १९९२

आज मी हसलेय...

आणि हे "पत्रोत्तर" होतं?

बाकी तुम्ही माणसाळल्याचा सूर पकडला ते पाहून जरा बरं वाटलं हे नक्की. मी बाहेरगावी निघणार होते, इतक्या लवकर तुमचं उत्तर येईल असं अजिबातही वाटलं नव्हतं, तुमचं पत्र आलंच तर ते काकांना जपून ठेवायला सांगितलं होतं, पण मी निघण्याआधीच ते आल्यामुळे उत्तर देऊ शकतेय. मात्र मी काहितरी वेगळं उत्तर येईल तुमच्याकडून ह्या अपेक्षेत होते.

असो.

घरच्यांच्या हालचालीवरून जाणवतंय माझा पत्ताही बदलेल लवकरच- कदाचित येत्या ८/९ महिन्यातच, कळवेन योग्यवेळी..

मी बरी आहे, माणूस म्हटलं की तब्येतीच्या कुरबुरी असणारच!

आपली नम्र,
निर्मयी.
(पुढचं उत्तर महिन्याभराने)
-----------------------------------------------------------------

२८ मार्च १९९२

निर्मयी,
तुझ्या पत्रांमधून तुझ्या काकांवरही माझा विश्वास बसायला लागलाय, उत्तर त्यांच्या हातात सुरक्षितच राहिल असे गृहीत धरून- हे पत्र!

माझ्यातल्या "मी" ला फार स्वातंत्र्य दिलंय मी... म्हणूनच बरेचदा माझी कित्येक कामं खोळंबतात! तो आपला उपटसुंभासारखा कधीही पडतो बाहेर, जग फिरायला, त्याची नजर वेगळी आहे, त्याला अदभुत गोष्टी दिसतात- ज्या सहसा आपल्याला उमगतच नाहीत.. खूप फिरून नवं काही बघून तो परतला की त्याला व्यक्त व्हायचं असतं आणि त्याचा व्यक्त होण्याचं माध्यम मीच असतो.
मागच्यावेळी तुझं पत्र आलं तेव्हा सुन्न झालेला 'तो' काही कागदावर उतरू द्यायला तयारच नव्हता, त्यामुळे तेव्हा परिवर्तित झालेला तुझ्या तब्येतीबाबतचा एकमेव विचार लिहून पत्र पाठवून दिलं.

आता तुझ्या शैलीत जरा लिहायचं झालंच तर,
मला गंमत वाटते- तू मला, "माणूस समजलाय का?" विचारलेस तेव्हा.
तुझ्या पत्रांतून आणि माझ्या वागण्यातून -तोच माणूस- उलगडतोय, असं नाही जाणवलं तुला?

मला नकोत नाती, हे ज्या क्षणी मी ठरवलं त्या क्षणापासून झटून ते मिळवलं- तेव्हा माझ्यातल्या लेखक नव्हता, नाती जोपासणारा समाजातला समाजशील घटक नव्हता, ती मागणी माझ्यातल्या मूळ व्यक्तीची होती, मग हवं ते घेतलं करून...
व्यक्तीला- व्यक्तीसारखे जगू द्यावे- हा तूच मांडलेला विचार- जेव्हा मी जगलो, तेव्हा तुला मी आजच्या भोंदू साधूंसारखा कसा भासलो... न कळे!

आणि हो, हो- जीर्ण झालेली बेरंग नाती निरोपाच्याच भिंतींवर टांगली मी- कायमची...!! पण त्यांचे पायपुसणे तर नाही केले ना? त्या जीर्णत्त्वाचा सन्मान राखत निरोप दिलाय!

तू म्हणतेस ते संस्काराचं ओझं मी डोक्यावरून जरा कडेवर काय घेतलं, तुला हजार प्रश्न पडले?

ह्यांची उत्तरे तुझ्याचकडे आहेत.

तू कधी निर्मीतीचा आनंद लुटला आहेस? त्यांत नखशिखांत न्हाली आहेस?
माझ्यातला "मी" जेव्हा झिंगून परत येतो, जेव्हा त्याला मी हवा असतो व्यक्त होण्यासाठी तेव्हा तोच कैफ माझ्यावर दाटतो.. त्याला व्यक्त व्हायचंय की मलाच, तो सांगतोय मी लिहीतोय की मीच बेभान लिहित सुटलोय, की त्यानेच माझा सबंध ताबा घेतलाय आणि मी मनाच्या एका कोपर्‍यात निमूट उभा आहे- जे होतंय ते पहात? ह्यातलं काही काही कळत नाही... आमची सरमिसळ इतकी उच्च होते की एकरूप झाल्याची धाप लागते...
शब्द कागदांवर झिरपत जातात आणि त्याच धुंदीत पानं भरत जातात, उलटत जातात....

तो कैफ-ती नशा-ती झिंग उतरते तेव्हा मी समाधानाने निथळत असतो- पाण्याचा एक ग्लास पोटात रिचवून मी कागदांवर उतरवलेलं वाचताना एक त्रयस्थ होतो- मी काय उमटवत गेलोय- आणि ते सुंदर आहे ह्याचा विश्वास बसल्यावर त्या क्षणाला जो आनंद असतो- जणू त्या "एका" क्षणासाठी हा जन्म होता... हा क्षण मिळवण्यासाठी अनेकानेक तास- दिवस मी रेंगाळतोय जगण्याचा निव्वळ भास घेऊन, असं वाटत रहातं....

तू परतलीस की उत्तर दे!

उत्तराच्या अपेक्षेत
- अस्तित्व.
------------------------------------------------------------------------

३० एप्रिल १९९२

निर्मयी,

अगं आलीस का? कशी आहेस?

- अस्तित्व.

----------------------------------------------------------------------

१० मे १९९२

निर्मयी??

- अस्तित्व.

------------------------------------------------------------------------
३० जून १९९२

निर्मयी,
अगं महिनाभर म्हणून गेलीस कुठे?
ह्या पत्राच्या उत्तराची १५ दिवस वाट बघणार आहे, न आल्यास, मी येतोय, तुला भेटायला.

उत्तराच्या अपेक्षेत,
- अस्तित्व.

------------------------------------------------------------------------
९ जुलै १९९२

भेटीसाठी अधीर झाला आहात, की भावना तुमच्याशी खेळ करत आहेत?
बाकी माणसात आलात, ते पाहून बरं वाटलंच आहे...

आपली भेट व्हावी, अशी माझीही इच्छा आहेच, परंतू मी काही दिवस संपर्कात नसल्याने असे अधीर होऊन भेटायला वगैरे येणं, मला नको आहे...
आपल्या दोघांत नातं काय, की तुम्हाला 'काळजी' तरी वाटावी?

"नातं नसावं" ही तुमची गरज आहे आणि आता माझ्या जगण्यातलं मुलभूत सत्य!
गरजा बदलतीलही, पण सत्याला पाठ फिरवणं अशक्य.

आता काही महत्वाच्या गोष्टी, अस्तित्व...

१) अजूनही तुमचं नाव,गाव, पत्ता, मला माहिती नाही.
२) पत्रव्यवहार खंडित होऊ शकतो, कारण; मी अमेरिकेला जाते आहे, लवकरच.(योग्य वेळी सांगेनच)
३) तुम्ही अचानक आला असतात, तर मला (निर्मयीला) न भेटता, सायली जगतापेला तुम्हाला भेटावे लागले असते, आणि माझ्या ह्या पत्रव्यवहारामुळे तिच्यावर कुठलेही संकट नको आहे मला.
४) माझा दवाखाना प्रकार थांबतोय बहुधा, त्यामुळेच अमेरिकेला जाणं सोयीचं होणार आहे
५) माझी पत्रं अचानक येण्याचं बंद झाल्यास... फार विचार करू नका... तुमचं "मनासारखं" आयुष्य पुरेसं आहे, तुम्हांला साथ देण्यास...

शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं....
आपल्या ह्या पत्रांमुळे, मी मोकळं व्ह्यायला शिकले आहे, हसून बोलायला शिकले आहे... तुमची पुस्तकं अनेक वर्ष सोबत आहेत माझ्या, आता ह्या पत्रांनी मलाच संजीवनी दिली... एक माणूस म्हणून तुमच्यातला माणूसघाणा व्यक्ती जरी मला आवडला नसला तरी, माझ्या आवडत्या लेखकाशी माझ्या विचारांची देवाण घेवाण मला नक्कीच भावली आहे

तुमचीच
निर्मयी...

_______________________________________________________

१८ जुलै १९९२

काय लिहू? गोंधळून टाकतेस.

काही पत्रांपूर्वी, "माणूस समजलाय का" असा प्रश्न जेव्हा तू विचारतेस, तेव्हा माझ्यातला एक माणूस, तुझ्यातल्या एका माणासाशी माणूसकी म्हणून त्याला भेटू शकत नाही? त्याच्याशी संवाद साधू शकत नाही?

ह्यात "नातं" असावं, हा मुद्दा येतोच आहे कुठे?

इथे तर आपण मित्र देखील नाही आहोत कारण निव्वळ एका ठराविक पातळीवर आपली चर्चा आहे, त्यात खेळकरपणादेखील नाही...

विचारांची परिपक्वता असलेल्या दोन व्यक्तींनी एकमेकांना भेटणं, बोलणं, त्या व्यक्तीनं एकाएकी नाहीसं झाल्यामुळे त्याच्या शोधात जाणं ह्यात निव्वळ माणूसकी असूच नाही शकत... किंवा आपलेपणा तरी? नात्याचं लेबल येतंच कुठून?
असो.

मला समजलं नाही..
तूच स्वत: सायली आहेस, असं म्हणाली होतीस... मग आता तू आणि सायली दोन भिन्न व्यक्ती असल्याचं कसं सांगते आहेस...

अमेरिकेला जाण्याचा, आणि पत्रव्यवहार बंद होण्याचा संबंध काय? पत्र तिथंही पोहोचतातच.

दवाखाना सुटल्याचं ऐकून छान वाटतंय, ह्या शारिरीक समस्या त्रासदायक असतातच...

निर्मयी,
हो! माझ्यातला मी अस्वस्थ झालो होतो, तूझी उत्तरं मिळाली नाहीत तेव्हा, कारण... .... कारण मी असाच आहे.
माझ्या कथा लिहीतानाही मी माझ्या पात्रांत गुंतून जातो... इतका की त्यांची कहाणी मी जगत असतो... ती काल्पनिक पात्रं "मी" होतो आणि त्यांच्या पद्धतीने जगू लागतो... त्या पात्रांची कहाणी संपेपर्यंत... ते प्रत्येक पात्र माझ्यापासून विलग होतानाही मला अतोनात त्रास होतो, कारण त्या प्रत्येकासाठी मी माझं जगणं काही काळ सोडून एक नवं जगणं जगत असतो... मी माझा ताबा मिळवताना, त्या पात्रातल्या कहाणीला विराम देणे गरजेचेच असते...

माझ्यासाठी हा पत्रव्यवहार एक कहाणी होतो आहे, तू एक अनोखं पात्र आणि मी तुझं जगणं जगू पाहतो... तिथे गुंततो.. त्या पात्रानं फारकत घेऊन नाहीस झालेलं मला पचलं नाही... कारण ही कहाणी अजून संपलीच नाही.

-अस्तित्व.

----------------------------------------------------------------------------------------

२८ जुलै १९९२

नमस्कार....!

अच्छा, म्हणजे तुमच्यातला लेखक, नव्या कथेचे बीज शोधतो आहे तर... सहाजिक आहे म्हणा, ती कलाकाराची वृत्ती असावी.

पुन्हा संधी मिळेल ना मिळेल, एक सांगायचं होतं, मला ह्या पत्रव्यवहारातून खूप मोकळं होता आलं/ येतंय ह्यासाठी मी तुमची कायम ऋणी आहे.

मी काही दिवस पत्रोत्तर न दिल्याने, तुम्ही अगदी मला भेटायला येणार होतात, ह्या वागण्यातून माझ्या तुमच्याप्रती काही अपेक्षा निर्माण होऊ पहात आहेत... हे चूकीचंच आहे...... तरीही.

आपल्या दोघांचं माहिती नाही, पण आपल्या विचारांची एकमेकांशी मैत्री झाली आहे, असं वाटतं
 
अस्तित्व,
सायली- माझी मैत्रिण, जिवलग सखी!
मी पत्रव्यवहारासाठी माझा पत्ता वापरू शकले नसते, वापरू शकत नाही, म्हणून तुम्हाला तिचा पत्ता दिला.
तिने ह्या पत्रव्यवहाराला संमती दिली आहे, तिचा पत्ता मला वापरू देते आहे
तिच्या घरी दिवसभर तिच्याव्यतिरिक्त कुणीही नसतं म्हणून आजवर हा पत्रव्यवहार बिनबोभाट पार पडला, पडातोय.

आता, माझा पत्ता का देऊ शकत नाही...
ह्यामागे माझी स्वतःची अनेक कारणे आहेत.

दोन- दोन अयशस्वी लग्नानंतर, आई वडिलांच्या घरी माघारा आलेली मुलगी... एक परित्यक्ता, हिला आपल्या समाजात आजच्या ह्या काळातही फार मोकळं वागता येत नाही, त्यात जर आई वडिल फार प्रतिष्ठित आणि परंपरांना जपणारे असतील, तर माझ्यासारख्या बंडखोर विचाराच्या मुलीला आणखीच दडपले जाण्याची शक्यता असते.

संवेदनशील मन.... हा एक शाप आहे अस्तित्व...

निगरगट्ट, हवं तेच करणारे, मनाला वाटेल तसं जगणारे- पर्यायी तसं वागल्याची किंमतही चुकवणारे... ह्या सार्यांचा मला नितांत आदर वाटतो.. कारण, मी हे साधू शकलेली नाही.

आणि म्हणूनच
म्हणूनच तुमच्याबद्दल आदर आहे.. तुम्ही वाट्टेल ते करू शकलात, स्वतःला नकोशा बंधनातून सोडवू शकलात, त्यात एकटं राहण्याची किंमत तुम्ही आनंदाने चुकती केलीत...करत आहात (?)

"एकट जगता येणं, तरीही समाधानी" ही असाध्य कला आहे.. ती तुम्ही साधली आहे..

तुमचीच,
निर्मयी

_____________________________________

१० ऑगस्ट १९९२

निर्मयी,

मला तुझ्या पत्रातून समजत जाणारी तू फार वेगळी वाटत नाही आहेस, आता.
चारचौघींसारखीच संसाराच्या समस्यांनी त्रस्त होऊन वैताग/ नैराश्यपदाला पोहोचलेली व्यक्ती... त्यामुळे, स्वत:ला फार उलगडू नकोस माझ्यासमोर.... एक वेळ अशी येईल की मला "तू" पूर्ण समजशील, तुझ्या बोलण्यामागचा, विचारांमागचा गूढपणा पारदर्शक होईल आणि मग आपल्या संभाषणातलं स्वारस्यच संपेल...
ते टिकवून ठेवूयात..

मला वाटतं, आपल्या समस्या आपणच निवडतो, दु:खही.
इथे तुला माहिती आहे, तुझ्या समस्या काय आहेत, हे ही ठाऊक आहे, की तू बंडखोर आहेस (तू आहेसच!) पण तुला स्वतःला परित्यक्ता, दु:खी, पिचलेली म्हणवून घेण्यातच आनंद दिसतो आहे.. तू केलाही असशील तुझ्या परीने प्रयत्न, सगळ्याशी लढलीही असशील, पण जिथे थांबली आहेस, ती जागा तूच निवडलेली आहे..

असो-  आपापल्या समस्या, आपल्या आपणच सांभाळूयात.

अ- पे- क्षा
ह्याच नको असतात, त्याचेच कोंब तुझ्या मनात फुटू पहात आहेत, वेळीच निग्रहाने उपटून टाक. माझ्याकडून ठेवल्या जाणार्या अपेक्षा माझ्यापर्यंत पोहोचत नसतात. पोहोचल्या जरी, तरी "पूर्णत्व" नावाचा प्रकार ना कधी त्यांनी पाहिलाय ना अनुभवलाय....

मी एका साहित्य परिषदेची संहिता करण्यात सध्या मश्गूल आहे, काही दिवसात त्याच्या फायनल ड्राफ्ट वर काम करेन, मी परिषदांना उपस्थित रहात नसलो तरी संहिता बनवून देणे हे माझ्या बुद्धीला आव्हान देते, म्हणून आवडते.
 असो, सांगायचं हे आहे, की इथून पुढे पत्रोत्तरांना कसाही/ कितीही विलंब होऊ शकतो..

पण तू पत्रे पाठवत रहा, मी सवडीने देईन उत्तर!


-अस्तित्व

--------------------------------------------------------------

२० ऑगस्ट १९९२

आपल्याला समजून घेणारं कुणी दिसलं, की त्यानं अधिकाधिक समजून घ्यावं, घेत रहावं, ही अपेक्षा आहेच चूकीची. अतिरेकी!
तुम्ही "आपलेपणा" दाखवत भेटायला येण्याची तयारी दाखवू शकता, पण मी अपे़क्षा म्हटलं की झटकलंत सगळं, सोयीस्कर आहात, पण बहुधा हाच तुमचा स्थायीभाव आहे.

मीही घरी नसेन आता, येते काही दिवस, एका कार्यशाळेत (वर्कशॉप) सहभागी होईन त्यामुळे. तरिही पत्र पाठवू नयेत, कारण सायलीला ते सांभाळने उगाच त्रासाचे होईल.

गम्मत आहे- इथून पुढे तुम्हाला सवड नसणार, परिषदेच्या कामामुळे आणि मी,  त्या कार्यशाळेतून परतताच अमेरिकेला निघेन, आता भारतात मी फक्त काही दिवस आहे, त्यामुळे पुढील पत्रव्यवहार आहे की नाही- माहिती नाही...

की संपली ही कहाणी इथेच- माहिती नाही.....

आणि अजूनही तुम्ही कोण?

माहिती नाहीच!!!


-निर्मयी.
--------------------------------------------------------------

१४ सप्टेंबर १९९२

निर्मयी,

खूप कामात आहे आणि तितकीच मजा घेतो आहे. ह्या परिषदांना उपस्थित न रहाता ही, त्यांनी माझ्यावर अवलंबून असणे, संहितेसाठी, हे मला सुखावतं!

पत्र कधीच मिळालं तुझं, पण उघडलं नव्हतं, आज वाचताच उत्तर देतोय, अचानक तू निघण्याची भाषा केलेली पाहून जरा आश्चर्यही वाटलंच...

मला तुला भेटायचं आहे, तू अमेरिकेला जाण्याआधी... त्याचं कारण सांगतो (नाहीतर, स्वभावानुसार तू तर्क- वितर्क लढवून, नव्या अपेक्षाही निर्माण करशील)
मी नेहमी, कथेततली काल्पनिक पात्र रंगवतो, तुझ्या रूपानं सजीव पात्रं मला मिळत असताना, तुला भेटल्यानंतर नवी कथा फुलवणं सोपं जाईल, इतकाच स्वार्थ मनात आहे.

बाकी, अमेरिकेला जाण्याशी, पत्रव्यवहार थांबण्याचं कारण मला समजलं नाहीच.

सायली जगतापे नामक कुणी मुलगी ह्या पत्रव्यवहाराला संमती देते, म्हणून आपली पत्रे सुरळीत एकमेकांना भेटाण्यामागचं कारण मात्र समजलंय, पण उमजलं नाहीच..

तुला भेटल्यानंतर, तुझी गुढता संपते का, की तुझ्यातली व्यक्ती मला भावून गेल्याने हा पत्रव्यवहार अधिका-अधिक फुलत जाईल, हे आपली भेटच ठरवेल..

तर थेट प्रश्न असा आहे, कधी भेटूयात?

तुझा पत्ता आहेच, क्षमस्व, सायलीचा पत्ता आहेच माझ्याकडे (तू तिथेच आसपास रहात असावीस, असा कयास आहे)
तिकडेच भेटू.

तुझ्या आवडत्या लेखकाचं नाव- पत्ता-चेहरा-मोहरा तुला पहायला मिळेल आणि माझ्या कथेचा नव्या नायिकेचा चेहरा-मोहरा-वृत्ती -वागणं- जगणं मला पहायला मिळेल...

पत्रोत्तर दे...

आता तुझी येणारी प्रत्येक पत्र मला (कितीही कामात असलो तरी) वाचावीच लागतील, नाहीतर तडक अमेरिकेला जाऊन तू कथेवर पडदा पाडशील..... ते तू केलेलं मला नको आहे.

हे पत्र तुझ्यापर्यंत लवकर येईल, इतकीच आशा.

-अस्तित्व


१५ नोव्हेंबर १९९२

नमस्कार श्री विश्वास सरंजामे,

शेवटी आलातच ना...!
अनेक "पण- परंतु- प्रश्नचिन्ह", मलाही देऊन गेलात, स्वतःही घेऊन गेलात.

मी एवढ्या रुबाबात नाव लिहीलय वर तुमचं, पण ते तरी खरं आहे का, कारण आपली भेट झालीच कुठे?

हे पत्र लिहीताना आज वाईट इतकंच वाटतंय की मनात "पहिल्या" पत्राची भीती फिरून तशीच उभी आहे, तुम्हांला हे पत्र मिळेल का, ह्याची.
झाल्या प्रकारानंतर तुमचं आता पत्रोत्तर येणार नाही, हे गृहीत धरलंच आहे मी.

तुम्ही आलात,
फक्त 'सायली जगतापे' ला भेटलात,
परत निघून गेलात.....
मला भेटावसं नाहीच वाटलं?
सायलीने वारंवार सुचवलं तुम्हाला माझी भेट घ्यावी म्हणून, पण.... नाहीच!!

कसली भीती वाटली तुम्हांला विश्वास- मी फसवलं असं वाटलं, की स्वतःचीच भिती दाटली मनात?

सायलीने ह्या पत्रव्यवहाराला संमती दिली होती.
तिचा पत्ता मला वापरू दिला होता, मात्र तिला बिचारीलाच शेवटी सारा मनस्ताप झाला...!! हे घडू नये म्हणूनच, मी तुम्हांला "पत्रे पाठवू नका" असे निक्षून सांगितले होते. तुम्ही पत्र तर पाठवलेच, अन वर माझे पत्रोत्तर नाही म्हणून येऊन थडकलात सुद्धा.

सायलीला, "तूम्ही नेमके कोण आहात"  हे तिच्या घरी सांगताना किती त्रास सहन करावा लागला आहे, तुम्हांला कल्पनाही यायची नाही.
"ह्यांची पत्रं येत असत, पण ती निर्मयीची आहेत" हे कबूल करावं लागलं- शेवटी तिच्या मानी संसाराचा प्रश्न होता.

जो पत्रव्यवहार माझ्या घरच्यांपासून लपवून केला जात होता, तो असा सायलीच्या सासर्यांमार्फत त्यांच्या कानावर गेला, समाजातील स्थानाला जीवापाड जपणार्या माझ्या पालकांना असा वेगळा मनःस्ताप झाला. ह्या सगळ्यात 'काका' मात्र हकनाक भरडल्या गेले.

तुमच्या एका येण्याने, सगळी उलथापालथ झाली.

आलात तर आलात, माझ्या आरोग्याबद्दल ऐकून थेट पळ काढलात. मला तुमचा राग येत नाही आहे विश्वास, माझ्या स्वतःवर मात्र खूप हसायला येतं आहे.

खरं तर,
आपण मागितलेले हजार मागणे उधळून लावणारा तो देव, एक रंगलेला डावदेखील किती सहजगत्या उधळू शकतो, हे पुन्हा अनुभवलं!

मला तुमच्याकडून हवं तरी काय होतं, विश्वास?
फक्त मन मोकळं करण्याची एक जागा. त्यापलीकडे अपेक्षा तरी काय होती माझी.. पण भेटण्याची घाई केलीत, विश्वास... घाई केलीत...

'माझा पत्ता बदलेल कदाचित' हे जे मी तुम्हांला कळवलं होतं, ते घडलंच.
मला गाडीत घालून घेऊन जाताना तुमचं शेवटचं काही पत्रं माझ्या हाती कोंबून, माझी सायली टीपं गाळत होती!!
माझा सारा इतिहास सायलीने तुम्हाला सांगितलच आहे

माझ्या इतिहासाचा पूर्वार्ध जराही लक्षात न घेता माझी 'आताची परिस्थिती' ऐकून तडक आल्यापावली निघून गेलात? कदाचित मला भेटला असतात, तर आज माझा शेवट वेगळा असता... पण जर- तर ला अर्थ असता तर...? जाऊ देत.

काय चुकलं होतं हो जगतांना माझं?
काय दोष होता माझ्यात?
मला स्वतंत्र- स्पष्ट- ठाम विचार होते, आहेत हा?
की, त्या विचारांना समर्थपणे पाठिंबा देत मला बंडखोरी करताच आली नाही हा?

लग्न करून सासरी गेले- चारचौघांसारखीच- नात्याचा तुमच्यासारखा तिटकारा नव्हताच मला.
माणूस घडतो, पुढे जातो- त्याच्या जडणघडणीला प्रत्येक नात्याची पायरी गरजेची असते- असंच नेहमी वाटायचं. हेच जपत जगत होते.

विचारांना तोवर फारशी तीव्रताही नसावी; पण अतिसंवेदनशील मन त्रासदायीच.

नात्यांतले बदल नजरेला जाणवू लागले, मूल न होण्याची सारी जबाबदारी माझ्या एकटीवर लोटण्यात आली.
भरीला गैर वागणूकही सढळ हस्ते देण्यात आली... का?

आवाज उठवण्याआधी फक्त आई-बाबाच का दिसले डोळ्यांसमोर- मुलापे़क्षा मुलगी बरी- प्रकाश देते दोन्ही घरी... हे ते कारण, त्यांची मान मर्यादा जपायची... फक्त?

माझं ऐकून घेण्याइतकाही सन्मान मी सासरी कमावला नव्हता का?? एक नाही, लाख प्रश्न!
त्रास होऊ लागला आणि हाच- हाच पहिला वार होता- मनावर माझ्या जिवंतपणावर- माझ्या असण्यावर!

त्रास असह्य झाल्याची परिणती घटस्फोटाशिवाय दुसरी असणार ती काय?

निसर्गावर माझंही प्रेम होतं, विश्वास- जीवापाड होतं!
जसं जगणं उलगडत गेलं, तसं हे प्रेम घट्टं होत राहिलं....
त्याने दिलेल्या स्त्री जन्मावर प्रेम होतं, त्याने माझ्यात पदोपदी घडविलेल्या बदलांवर होतं, त्याने देऊ केलेल्या प्रत्येक हळूवार भावनांवर होतं...
दु:ख हे की, "ह्याच" भावनांनी माझा चुराडा केला.

आता मला "आई" व्हायचं होतं!
तुम्ही विचारलं होतं मला, निर्मितीतला आनंद मिळवला आहेस का? तुम्हाला तुमच्यातला तो कलाकार- उदार झाल्यावर ही निर्मिती करण्याच सुख मिळू शकतं, विश्वास, आम्हां बायकांना एक अत्युच्च निर्मिती करण्याची संधी खुद्द निसर्गदेवतेने देऊ केलीये..

मला ना कुठल्या ऐहिक सुखाची आस राहिली होती ना शारीरिक! माझ्यातल्या मूळ व्यक्तीची फक्त एक मागणी उरली होती- मला आई व्हायचं होतं... मला ती निर्मिती हवी होती त्या एका गोष्टीसाठी मला हा स्त्री जन्म सार्थकी लावायचा होता.

दु:खाची सारी मरगळ झटकून उठले, माझं प्रत्येक आवश्यक चेक अप करून घेतलं, सगळे रिपोर्ट चांगले आले तेव्हा दुसर्या लग्नाची तयारी दाखवली.
स्वतःच्या आईवर असफल प्रेमाचा सूड म्हणून कुणा एका पुरुषाने माझ्याशी लग्न तर केले, पण ...... पण त्या नात्यातच मला हवं ते मिळवून द्यायची ताकद नव्हती!

इकडे निसर्ग मला पिळवटत होता आणि तिकडे माझं भाग्य माझ्यावर हसत होतं!!

तुमच्यासारखं सडेतोड वागून, हवं ते मिळवण्यासाठी मला मात्र संस्कारांचं बलाढ्य गाठोडं नाहीच आलं उतरवता... आज वाटतं, पुढची पिढीच माझ्याकडून उदयाला येणार नव्हतीच तर गाठोडं मी तरी का जपलं?

ह्या सार्या विचारांनी, मला दिवस दिवस खाल्लंय, मी कित्येक महिने एकांवासात काढलेत -शांत शांत बसून राहिलेय, कुणाशी बोलत नव्हते- एका खोलीत कोंडून घेतलं होतं स्वतःला...

मला एकच ध्यास लागला होता- निसर्गाचं ते दान पदरी पाडून हवं होतं- बास!!
ह्या इच्छेचा अंमल माझ्यावर इतका जबरदस्त होता की, कधी कधी माझ्यातला हिजडा जागा होत असे- हो हेच नाव देईन मी - कारण मला स्त्री मर्यादा ओलांडायला लावण्याचा त्याचा तगादा होता पण पुरूषांइतकाच मला कधी बेपर्वा होऊ न देणारा तो 'बंडखोर विचार' असायचा!!

शेवटी सारं शांत झालं!!

निसर्गाने वय वाढवलं उर्मीही दडपून टाकली पण; माझ्यावर हल्ला झाला होता- दोन मांजरींचा- एक स्वतः निसर्ग नि दुसरं माझं भाग्य, त्या हल्ल्यांनी मला उंदरासारखं खेळवून घेतलं, मला शांत करण्याआधी त्यांनी माझं सर्वांगीण नुकसान घडवलं!!

दोन रितसर लग्न- रितसर काडीमोड- मनाची दुरावस्था- ह्यांत समाजाची बोलणी आणि माझे विमनस्क कुटुंबिय- ह्या मधल्या काळाने मला निपचित करून टाकलं होतं- माझी मनःस्थिती सुधारावी म्हणून शेवटी मला मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्यात आलं....

एक मात्र सांगेन,
माझ्यासारख्या मनस्वी लोकांच्या इच्छा ही तेवढ्याच मनस्वी असतात, त्या पूर्ण करण्यासाठी ताकदीचा सहचर मिळणं गरजेचं असतं, तसं झालं, तर माझ्यासारख्या व्यक्ती घराचं नंदनवन करू शकतात

तुमच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला, मी मोकळी होऊ लागले- इतकी, की माझ्यातले दडपलेले विचार मोकळे होण्याने माझ्यातली सुधारणा पाहून माझे डॉक्टरही स्तिमीत झाले.
त्यांनी मला आश्वासन दिलं होतं- अशीच जरा हसून खेळून राहशील तर 'तू ठणठणीत बरी आहेस हे सर्टिफीकेट देतो' हे सारं पाहून खरेच आनंद झाला होता,
काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं माझा पत्ता बदलेल कदाचित- अमेरिका!!
माझे कुटंबीय मला घेऊन परदेशी भावाकडे जाणार होते- आजवर त्याच्या सुरेख संसारात माझ्या रोगाचं विष नको म्हणून मी इथेच होते आणि माझ्यामुळे माझे आई-वडील पार अडकले होते.

मला डॉक्टरांकडून परवाना मिळताच हे सारं तुम्हाला सांगून, तुमच्या पदरात सारं श्रेय टाकून तुम्हाला भेटणार होते- अर्थात तुम्ही "हो" म्हणाला असतात तरंच- ह्या सार्या गडबडीत पत्रव्यवहार खोळंबला कारण मी डॉक्टरांच्या कार्यशाळेत सहभागी झाले, तिथेच रहावे लागले.

आणि मग तुमचा प्रवेश - मला न भेटताच एक्झिटही!!

हा आपला पत्रव्यवहार- सारी पत्रं पाहून मानसोपचार तज्ज्ञांनी माझा पत्ता खरंच बदललाय!!

"मनस्विनी मनोरुग्णालय....."

मला भेटून- माझ्या आई बाबांना, डॉक्टरांना सांगितलं असतंत- ही मुलगी वेडी नाही- मी जाणतो हिचं अंतर्मन, तर कदाचित.... छे! पुन्हा जर- तर...

मला मानसिक त्रास आहे- आणि माझ्यावर उपचार सुरू आहेत हे ऐकताच आपण पोबारा केलात... का सांगू?

तुम्हाला भिती वाटली. स्वतःची, स्ततःच्या "व्यक्ती म्हणून जगण्याच्या" प्रवृत्तीची, स्वतःच्या "मनस्वी वागण्याची", उद्या तुमचाही पत्ता माझ्यासारखाच होऊ नये म्हणून पळ काढलात...!

असो.

आज कित्येक दिवसांतर भावनिक आवेगात हे सारं लिहीलंय, कदाचित हा आवेग शेवटचाच...! आता मनोरुग्ण म्हणून जगताना असले आवेग उपयोगाचेही नाहीत, आलेच तर ते पूरकच समजले जातील आता माझ्या डॉक्टरांकडून.

कधी-कधी आयुष्य काठावर येऊन उभं ठाकतं, अशावेळी गरज असते एका हाताची!
तो हात मला तुमच्या रुपाने गवसला. तोच हात मला ओढून नेऊन माणसांच्या यादीत बसवू शकला असता पण दुर्दैव असं की त्याने पलीकडे धक्का दिला.... पहा आज दरीत कोसळले आहे.

पण एक सांगू, तुम्ही खर्या अर्थाने "व्यक्तीस्वातंत्र्य" मिळवलंय, ते व्यर्थ जाऊ देऊ नका.
मला माझ्याच नातेवाईकांनी वेड लावलं, तुम्हाला 'वेडं' ठरवण्यासाठी तुमच्या अवती- भोवती कुठलीच नाती नाहीत. न समाज तुम्हाला छळतोय! शिवाय तुम्ही दिलखुलास जगू शकताय- हवं तेव्हा निर्मितीच्या मौलिक समाधानात निथळू शकताय...
असेच रहा!
माझे इतर सल्ले तुम्हाला पटत आलेत- पण आज हे पत्र मनोरुग्णालयातून आलंय म्हटल्यावर हास्यास्पद वाटेल, नाही?

माणसाचं अंतर्मन त्याचं व्यक्तिमत्व ठरवतं असं म्हणतात, तुम्ही माझं ते अंतर्मन जाणलंय, म्हणूनच मला फकत एकदाच उत्तर हवं होतं, तेही तुमच्याचकडून,

मी खरेच मनोरुग्ण आहे का??

-निर्मयी

----------------------------------------------------------------------------------
...

Post a Comment

5 Comments

 1. Baapre ekdam khatarnaak lihilaat

  Great

  ReplyDelete
 2. what a wide canvas the author has covered & with what finesse !
  a grand piece of writing.

  ReplyDelete
 3. Bageshree, I was stunned after reading this....could not comment for a long tym.... but this is simply speechless. U have woven each emotion of female in it.....! Hats off....

  ReplyDelete
 4. बागेश्री... तुमची ही कथा (पत्रसंवाद) मी बस मधून ट्रॅव्हल करताना वाचला.. असं वाटत होतं की हे वाचन संपेपर्यंत माझा स्टॉप येऊच नये.. सुरवातीची त्यांच्यामधील औपचारिकता.. नंतर फुलत जाणारा संवाद.. खूपच भावनिक..
  नात्यांवर एका वेगळ्या दृष्टिकोनातून केलेलं भाष्य अगदी भावतं.
  वाचता वाचता वाचक पुढचे कयास लावू लागतो. पण तुम्ही ते खोडुन काढत अजून वेगळा दृष्टिकोन देऊन जाता.. पत्रं आता लूप झालीयेत.. आजच्या ऑनलाइन chatting च्या जमान्यात पुढचा काय रिप्लाय देतो यापेक्षा उत्तर द्यायला किती वेळ लावतो यावर नात्याची किंमत ठरवली जाते.. व्यावहारिक झालाय संवाद.. मग समोरचाही जास्त विचार न करता अगदी जास्त विचार न करता उथळ रिप्लाय करतो..
  तुम्ही आणखी एकदा आमच्या समोर पत्रसंवाद आणलात याबद्दल धन्यवाद..
  तुमच्यासारख्या लेखिकेकडून माझ्या ब्लॉग वर visit व्हावी ही इच्छा आहे..

  www.vishalwords.blogspot.in

  ReplyDelete
  Replies
  1. नमस्कार विशाल,
   तुमच्या प्रतिसादाकरता धन्यवाद. तुमचा ब्लॉग पाहिला. उत्तम आहे. इंजिनिअरींग करूनही लिहिते आहात हे फारच कौतुकास्पद. तुमच्या ब्लॉगचे डिझाईनही उत्तम आहे. मला त्याबाबत काही टिप्स मिळाल्या तर आनंद वाटेल

   Delete