झाड झाडासवे बोले..

झाड झाडासवे बोले,
काय गूढ आहे सारे?
नाही प़क्षी घरट्यांत
कसे झाले बंद वारे?

झाड उत्तरे झाडाला,
अरे सारे बदलले,
पक्षी रमती बाहेर
घेत वार्‍यासवे झुले..

झाड झाडासवे बोले,
काय सांगतोस असे?
नाही पक्षी नाही वारा
आता जगायचे कसे?

झाड उत्तरे झाडाला,
नको होउस उदास,
वय तुझे माझे झाले
त्यांचे तारुण्य भरास..

झाड झाडासवे बोले
उरे पानगळ अशी,
होतो बहरलो जेव्हा
सारे होते माझ्यापाशी...

झाड उत्तरे झाडाला,
जगण्याची रीत खरी
पंख फुटता फुटता
पक्षी भरारी भरारी

झाड झाडासवे बोले,
आत दाटून रे येते
रोज बोलतो जरी हे
फिरुनीया तेच वाटे..!
यावा बहर बहर
भेट चिमण्यांची व्हावी,
माझ्या अंगाखांद्यावर
पुन्हा हसावी खेळावी..
पण; जाणतो हे मीही
वाकलो रे मणक्यात
नाही येत त्यांच्या कामी
प्रेम जरी दाटे आत..


-बागेश्री
१/३/२०१२

Post a Comment

0 Comments