कात टाकली!

माझ्यातल्या मी ला
आज, मी अलगद सोडवलंय...

कात टाकली!

गरज होती..

काती वर चढलेली पुटं
रक्तपिपासू झाली होती...!
त्या पुटांनीच आत शिरून
उद्या माझा ताबा घेतला असता!

हे करताना,
कातीला आतून चिकटलेले,
माझे काही दमदार पैलू मात्र गमवावे लागलेत...

सगळेच सौदे मनासारखे कसे होतील?

झालेय मोकळी!
काहीशी हरलेली- बरीच जिंकलेली...
स्वतःला टिकवत,
नवा जन्म स्वहस्ताने साकारलाय!

हे करण्यास भाग पाडलेल्यांनी
मात्र, उद्या येऊन
"तू पूर्वीची राहिली नाहीस" हे म्हणताना,

माझी कात तेवढी घेऊन जावी.

Post a Comment

0 Comments