मन पाऊस पाऊस...(अष्टाक्षरी)

मन पाऊस पाऊस
चिंब अंगण- ओसरी,
कुंद गारव्याची हवा
गंध मातीचा पसरी..

मन पाऊस पाऊस
होते गालिचा हिरवा,
टेक क्षणभर तू ही
नको होऊस पारवा!

मन पाऊस पाऊस
पाणी डोळ्यांच्या द्रोणात,
अवखळ ओघळते
मंद हवेच्या झोकात!

मन पाऊस पाऊस
थेंब थेंबाने रुजतो,
ध्यास रुजे त्याच्यासवे
कोंब आशेला फुटतो..

मन झिम्माड पाऊस
आठवांची बरसात
माझ्या काजळात ओल्या
फुले उद्याची पहाट!!

मन पाऊस मेघांचा
सुटे मळभ जीवांचे
रंग आसमानी झाले
तुझ्या माझ्या नशीबाचे!

मन इतके बरसे,
दु:खं झाली मातीमोल
सल काढले खुडून
सरे पापण्यांची ओल...!

असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्‍या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!

मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!

-बागेश्री
१०/०४/२०१२

Post a Comment

2 Comments

  1. अनेक दिवसानंतर एक चांगला ब्लॉग वाचायला मिळाला. कविता आणि स्फुटके छान आहेत.

    ReplyDelete
  2. my blog is there mvkapuskari.blogspot.com

    ReplyDelete