असेच काही, अवती- भवती...!


अपयश झेलण्यासाठी
काही क्षण पुरतात, पण पेलण्यासाठी मात्र
सबंध आयुष्य!

महत्वाकांक्षांचे अपयश एकवेळ
पचतेही, पण नात्यांनी कच खाल्ली, की
सावरणारे हातच दुबळे पडतात...

तिथे 'आपलं' काही उरत नाही
'तुझं-माझं' नावाचा एक विचित्र प्रवास सुरू होतो!
आणि हळूहळू, वाटाच निर्णय घेऊन टाकतात,
विरुद्ध निघून जाण्याचा!
दोन प्रवासी- वेगळ्या वाटा, हुरहूर मात्र आत जपलेली..

ही खाल्लेली कच, रुतणारा सल
आणि लागलेली हुरहूर, मनात घर करून राहते,
नि त्या घरावर अपयशाचा झेंडा!!

आता स्वतःला समजवण्याचे अनेक नवे मार्ग, नवी कारणे, समर्थनाचे लाखो उपाय!

जोडलेली मनं तुटणं, ती दूर होणं, आयुष्याचे सुंदर- नाराजीचे, तर कधी संमिश्र क्षण ज्यासोबत अनुभवले, स्वत:त उतरवले- अशाला सपशेल विसरून जाणं, खरंच सोपं असतं का?

अशी अनेक तुटलेली नाती दिसली की विव्हळतं मन! 'सोबत' प्रत्येकालाच हवी असते.. कितीही कमावून निवांत आपापलं जगण्यापेक्षा, हे सारं 'कुणासाठी' तरी करतो आहोत ह्याचं समाधन शोधण्यात आणि ते मिळवण्यात आयुष्य गुंतलेलं असतं!

नेहमी, नकळत ह्या ओळी रूंजी घालतात ओठांवर, "कल तड़पना पडे याद में जिनके, रोक लो रूठकर उन को जाने ना दों"
थोडसं नमतं घेतलं, पडतं घेतलं, नि स्वतःपेक्षा जरासं जास्त महत्व नात्याला दिलं, की कोमेजलेली नातीही टवटवीत होतात, तशीच राहू शकतात!
हाच भाव इतका उदात्तपणे मनी रहावा, की सोबतचाही अलवार त्या रंगात उतरावा...!
हा प्रवास मग मात्र कायम आनंदाचा, बहराचा... राग- लोभ- खटके, असणारच- मतभिन्नतेचे ते सुल़क्षण- पण त्याच वेळी, निव्वळ मतांसाठी काडीमोड न होण्याची जबाबदारी दोघांचीही हवी..

खरं तर- इवलंसं आयुष्य, त्यात माणसं जमवतानाच अर्ध आयुष्य सरलेलं, हक्काचं मिळालेलं, मिळवलेलं माणूस सहजासहजी दुरावतं आणि मनातली पोकळी मग मिटत नाही...

अशावेळी वाटून जातं- एकदा हाक मारून बघावी, कोण जाणो पलिकडची व्यक्तीही, त्या हाकेसाठीच खोळंबून असावी!

Post a Comment

1 Comments

  1. बागेश्री, 'नात्यात नसलेलं प्रेम' ही माझी कविता फेसबुकवर पोस्ट केली आहे...संकल्पना अशी आहे की, प्रेम ही नैसर्गिक चेतना, संवेदन आहे; आपल्या जीवनातील चैतन्य आहे. कारण जे जे मंगल, चिरंतन, निरामय, सनातन, निर्विकार असतं, ते ते सत्य आहे...सत्य म्हणजेच परमानंद, ईश्वर. दोन जीव नाते निर्माण करतात. द्वैत म्हणजेच नाते...एक जोड, बंध...आणि भगवान पतंजली म्हणतात की जग हाच एक बंध आहे, जो आपल्याला जोडतो. हे वास्तव आहे पण सत्य नाहीयेय. म्हणून नात्यात खर प्रेम नसतच. मग नाती-गोती, हे जग कशासाठी? ह्याच उत्तर अखेर तूच छानपैकी दिल आहेस..."हाक मारून बघावी...." कोणी साद देत आहे का? पहावं...साद / साथ हवी असते...माझं जगण...त्याला साद हवी असते...पण आपल्याला खरतर साद नको असते...प्रतिसाद हवा असतो. कारण माझं जगण हाच साद झालेला असतो आणि त्याला प्रतिसाद हवा असतो, जगाकडून. साद-प्रतिसाद ह्यातूनच नाती जन्माला येतात आणि आपल्या मृत्यू बरोबर संपून जातात. पण माझं अस्तित्व जन्म-मृत्युच्या अलीकडे-पलीकडले असते. त्याला साद हवी असते, जगाची.माझं जगण हेतुपूर्ण होण्यासाठी...असो. मी माझी सगळी कविताच तुला सांगत बसलो आहे...तू ती वाच...तुझ्या ह्या काव्यमय लेखाला प्रति-पूरक अशी बाजू तुला सापडेल.

    ReplyDelete