आपण सारे अर्जुन..समांतर ते जगती
मत एक ना चुकून,
एक होकार भरितो
दुजा नकार घोकून...

वाटे निर्मळ वहावे
अडता, मना पुसावे
त्याने संभ्रम सारावे
आपणास सुखवावे!

प्रत्यक्षात असे नाही
मने धरी भिन्न तान
एक नित्य मी, मी करे
दुजा म्हणे मी महान..!!

मग सहजच वाटे
सारे आपण अर्जुन,
त्याचे प्रश्न मोठे होते
आणि संभ्रम कठिण..!!
इथे प्रश्न इवलाले
करी आपणा अर्जुन,
संभ्रमात जग म्हणे
नाही सुटका ह्यातून!

त्यास कृष्ण तरी होता
योग्य अयोग्य सांगाया,
इथे आपणच खरे
नसे कुणाचीच माया!

मग आपलीच तीर
दोन आपलीच मने,
नवे संभ्रम सोबती
सारी पाळाया वचने!!

Post a Comment

0 Comments