पैठणी

बहरलेल्या यौवनावर हिरवीकंच पैठणी रूबाबदार दिसावी,
तसं जगणं...

इच्छांना जरतारीचे असंख्य धुमारे, पदराला न पेलवतील असे
म्हणूनच पदर सांभाळत वेगाने वाटचाल करणं जिकीरीचं होत जाणारं!

जरीचे काठ, गोल फिरून पायापर्यंत उतरणारे, तसाच कर्तव्यांचा विळखा..
दिसताना लोभस पण तितकाच आवळणारा...

रंग खुलणारा, आमंत्रण देणारा- रस्त्यातले काटेही त्याच रंगात मिसळलेले,
म्हणूनच न जाणवणारे, खोल रूतून बसणारे, आपल्या आणि आमंत्रिताच्या!

त्या भुलवणार्‍या यौवनात, नक्की काय खुणावतंय
हे समजेपर्यंत होणारी सांज...
लोपलेले धुमारे,
पूर्ण- अपूर्ण कर्तव्य,
जीर्ण होत गेलेला रंग.....

पण जीवापाड जपलेल्या पैठणीला कुरवाळून छातीशी धरताना,
घामाचा नि अत्तराचा विरत आलेला गंध, त्याचा कैफ, काही औरच!

Post a Comment

0 Comments