प्रिय बाबाप्रिय बाबा,

हे संबोधन असंच आहे, नाही?
गेले अनेक अनेक वर्ष!!

आधीही कित्येकदा पत्र लिहीली आहेत तुम्हांला... कधीच 'तीर्थरूप' बाबांस असा उल्लेख नव्हता, नाही! प्रिय हाच उल्लेख.. मनातली जवळीक शब्दांत आणि हृदयातला आदर डोळ्यांत असंच आपल्या दोघांतलं गणित!

तुम्हांला पत्र लिहीण्यासारखा माझा आवडीचा छंद नव्हताच कधी... पण काळ सार्‍या सवयी बदलवतो, नाही बाबा?
आपल्या आवडी निवडी, आपले छंद सार्‍यांवर "प्रायोरिटी" नावाचा शब्द अगदी कुरघोडी करतो... 'मग मी "अमूक तमूक" फार आवडीने करत असे' असे वाक्प्रयोग उरतात!

आज-काल असं कधी पत्र लिहायला म्हणून बसते, अनेकदा तुमच्याशी मनातल्या मनात केलेलं हितगूज इथे कागदावर उतरवावं ह्या विचाराने पेन कागदाच्या पहिल्या ओळीला टेकवूनही ठेवते, पण काय... सूचत काहीच नाही... छान हवा यावी म्हणून खिडकी उघडावी अन बाहेरचं घोंघवतं वादळ अंगावर घ्यावं अशी सून्न अवस्था उरते ..मनाची ही खिडकी, आतलं वादळ, अन बाहेरचं सून्न पेन... सगळंच आवरून ठेवून द्यावं मग...

आज मात्र पुन्हा काहीतरी बोलावंस वाटलं... आणि ठरवलंय, जे जसं, ज्या ओघानं सुचेल, ते तसंच मांडायचं! त्यातलं सगळं तुम्हाला कळणार आहे, ही खात्रीच आहे, किंबहुना त्यात न आलेलंही तुम्ही समजून घ्याल हे जाणतेच!

कसे आहात?
लाख लाख वेळा फोन वर बोलणं होतं.. पण काळजातली काळजी थेट तुमच्यापर्यंत पोहोचते का, असं वाटून जातं.. त्या बोलण्यात बरेचदा औपचारिकपणा वाटतो.. असं पत्रातून कसं.. फक्त तुमची माझी भाषा असते.. दोघांची, दोघांतली!

बाबा,
वय वाढलं की नाती बदलतात का हो? की इतकी परिपक्व होऊन जातात की संभाषणाचा शिडकावा लागतच नाही?
मला सांगा ना, लग्न होऊन गेले तशी कितीशी राहिलेय जवळ तुमच्या? माझं घरात असणं तुम्हाला किती सुखावून जातं हे माहिती असूनही संसार नावाच्या व्यापात खूप गोष्टी निसटतात, हे मान्य करावच लागतं, अर्थात बाबा, ही तक्रार नाही बरं, फक्त जे फार आतून वाटतंय ते सांगतेय..

बाबा,
मी जगतेय... खूप काही शिकतेय, उघड्या डोळ्यांनी सारं समजून घेण्याचा, जमेल तसं स्वतःला परिस्थितीचा भाग बनवून घेतेय...पण सांगू, वीट येतो कित्येकदा, सगळ्याचाच... म्हणजे समाज, लग्न वगैरेचा नाही... तर आखलेल्या जगण्याचा... मग स्वच्छंदी जीवन हवंय का, तर ते ही नाही...मग हवं तरी काय... हवंय "जगणं" मूलभूत प्रकारचं जगणं! एक माणूस म्हणून... उगाच जड जड व्याख्यांनी भरलेलं नको... एका वयानंतर आपलं बरं वाईट जोखण्याची, माणूस ओळखण्याची अक्कल आपसूकच येते नाही...? मग त्या अकलेवर भरवसा टाकून असलेलं जगणं...

जगताना जीवनाची सूत्र समजत जातात, हो ना बाबा...? ही सूत्र पाठ करावी लागतच नाहीत... अनुभवांनी ल़क्षात रहात जातात...

बाबा,
कधी कधी असमाधान इतकं भयंकर व्यापून राहतं ना... सांजावलेल्या ढगांवर उतरणार्‍या काळीमे सारखं.. असं व्हायला नकोय, हे नीट समजतं, पण उमज? अहं.... कुठे असते कुणास ठाऊक!!!! मग अकारण मनाचा त्रागा होतो, आपल्या अशा वागण्याने ह्याला- त्याला- तिला त्रास होऊ शकतो वगैरे विचार करूच नये असं वाटतं...
कारण, वाटतं की
असमाधान पुरेपूर दाटलंय ना... दाटू देत की!! हे ही जगून घेऊ.... अशा वेळी शांत बसून राहू.. कुठल्याच चौकश्यांचा ताफा नको...
मला सांगा,
असं मुलभूत जगणं नसूच शकतं का... "आता जे वाटतंय, ते मला वाटतंय, ते तसंच मला जगून घ्यायचंय".. ह्याला आत्मकेंद्रीपणाच्या व्याखेत मोडावं लागतंच, नाही?

अशा कुठल्याश्या झोक्यावर झुलणं सुरू असतं!

बाबा,
कुठल्याही कर्तव्यात कसूर न करणं, हा माझा स्थायी स्वभाव, तुमच्या स्वभावाला पाहूनच आत्मसात केलेला असावा बहुतेक, त्यामुळे संसाराची घडी होती तशीच नेटकी आहे आणि राहू शकेलच असं वाटतं... ह्या गोष्टीबद्दल तुम्ही कायमच निर्धास्त रहा.

एक आठवतं?
"तुम्ही माझ्यासाठी आजवर इतकं केलंत... अनेक खस्ता...." हे सगळं मी कधीही बोलून नात्याला लहान करायचं नाही, असं एकदा कटाक्षाने सांगितलं होतंत ते? कित्येकदा मनात आलेलं हे सगळं परत फिरवते... खूप काही जाणवलेलं असतं.. तुमचं "देणं" तुम्ही दिलेली ठेव सार्‍यांबद्दल बोलायचं असतं... पण अलिखित करार मोडू तरी कसा?

हे पत्र वाचताना, प्रत्येक ओळीनिशी तुमच्या मनात जे काही सुरू असेल ते मला जाणवतंय.. आत्ता हे वाक्य वाचूनही हलकंच हसला असाल....

आणि हो, बाबा- मी शा़ळेत असताना, तुम्ही कधी शाळेत आलात किंवा आपण कधी बाहेर फिरताना तुमची ओळख "माझे बाबा" करून देण्यात फार- फार अप्रूप वाटायचं, तेच अप्रूप आजही कायम आहे ... तुम्हाला माझे बाबा म्हणून ओळख करून देताना तुम्ही बाहेर किती मोठ्या पोस्ट वर कार्यरत आहात, ह्याबाबतीत मला काहीही देण-घेणं नसायचं, पण एका लेकीला समर्थपणे समजून घेणारा पिता, इतकीच चमक डोळ्यांत असायची!!.. "मी, माझं" ह्या शब्दांतला इथे जाणवणारा लोभस अधिकार हवाहवासा आहे...

बाबा,
फार दगदगीची, फिरतीची नोकरी आहे तुमची... दूरूनच "काळजी घ्या" म्हणणं किती सोपं असतं ना, दोन शब्दांचा उच्चार!
               परतून पुन्हा तुमच्याबरोबर काही दिवस घालवता येतील का हो? आधीच्या आपल्या गप्पा, म्हणजे माझे भारंभार प्रश्न आणि जगणं समजून घेण्याची धडपड अशाच असायच्या... आता वेगळ्या असतील.. कदाचित फक्त काही हूंकारांमधेच जे सांगायचंय ते उमजेल... पण "सोबतीची" मजा वेगळीच... आवडत्या व्यक्तींच्या वलयात वावरणं खरंच सुखावह....

प़क्षी उडून जातात, घरट्यात पिलांचे आई बाबा मान उंचावून पहात रहातात, असं चित्र काढलं होतं कधीतरी... ते मनात घर करून आहे... त्या चित्रासाठीच बहुधा.. बरेदा परतून यावं वाटतं... कायमसाठी नसलं तरी थकलेल्या मनांना, शरिराला फुंकर मारण्यासाठी काही भरपूर काळ "सोबत" राहण्यासाठी.. स्वार्थी म्हणालात तरी चालेल.. पण खूप प्रामाणिकपणे वाटतं हे सारं!!

बाबा,
आज खूप जवळ बसून, हात हातात घेऊन गप्पा मारल्यासारखं वाटलं..
मी मांडलेल्या विचारांवर फार विचार करून त्रास करून घेऊ नकात... मी माझ्या प्रिय व्यक्तीजवळ बोलत बसले होते... बोलतच बसले होते!

चला, बाबा, येते!
कामं पडलीत....

पत्रोत्तर द्याल ना?

तुमचीच.

Post a Comment

0 Comments