तुझे इवले पाऊल....

तुझे इवले पाऊल,
बाळा घरभर पडे..
घर अंगण सजले,
दारी अमृताचे सडे

तुझे इवले पाऊल
जाग आणतसे घरा,
तुझ्या टपोर्‍या डोळ्यांत
माझी सामावली धरा

|तुझे इवले पाऊल,
आता शाळेलाही जाई,
पाटी-पुस्तक हातात
मागे पडली अंगाई

तुझे इवले पाऊल,
कसे भराभर वाढे,
नीती नियमांचे सुद्धा
त्याने गिरवले धडे

तुझे इवले पाऊल,
उच्चशिक्षणही ल्याले,
लागे अर्थार्जन करू
खरे स्वावलंबी झाले

तुझे इवले पाऊल,
हवा सोबती तयाला,
उभा जन्म सोबतीने
सप्तपदी जगण्याला

तुझे इवले पाऊल
जोडव्यांनी सजलेले,
कर संसार सुखाचा
 फुलो स्वप्न जपलेले

तुझे इवले पाऊल,
आता कधी-मधे येते..
सार्‍या घराला स्पर्शूनी
हलकेच परतते

तुझे इवले पाऊल
फार फार आठवते,
सार्‍या आठवणी तुझ्या
पाणी पापणीला देते

तुझे इवले पाऊल
करी संसार मानाचा,
नाव राखी संस्कारांचे,
आब दोन्ही घराण्याचा

तुझे इवले पाऊल
बाळा आता जडावले..
स्निग्धावल्या चित्तवृत्ती
अंग रेशमी जाहले

तुझे इवले पाऊल
आता रुप बदलते,
होता 'आई' तू तान्ह्याची
त्याला थोरपण येते

-बागेश्री 

Post a Comment

1 Comments

  1. I liked it very much.The step by step chronological changes in a daughter are tied in very rhythmic group of words.

    ReplyDelete