खोल खोल मनामध्ये....

धुंद आठवांची रात, जेव्हा डोळ्यात निजेल
खोल खोल मनामध्ये तूच तूच दाटशील

एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल
हर एक अक्षराला, गंध तुझाच असेल

चंद्र खिडकीशी पुन्हा, रेंगाळेल, खोळंबेल
गळालेले रितेपण मुठी भरून घेईल

तुझ्या सयी सार्‍या स्निग्ध, सभोताली फुलतील
तुझ्या गालातले हसू, माझ्या ओठी उमलेल

हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल
जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल

तेच रूप ह्या जगाचं, पण नवीन भासेल
तेच काजळ डोळ्याचं, पण नव्याने हसेल

खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल
तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील

कंच बहर फुलांचा, जरी उद्या ओसरेल
ताजा आठव तुझाच, माझ्या ओंजळी असेल

- बागेश्री 

Post a Comment

0 Comments