मन एकाकी नित्याचे...

असा गेलास रुसूनी
तुज आळवते आहे..
ओढ तुझी आजन्माची
श्वास कोंदवते आहे..!

वाट पाहता सरले
दिस एक एक असे
अश्रू आले, थिजलेही
गालांवर ओले ठसे..

वाट पहाणे नित्याचे
तू ना येणेही नित्याचे,
रेंगाळते उंबर्‍यात
मन एकाकी नित्याचे
----------------------------------------

एकाएकी गार वारा
उंबरठा ओलावला,
अन् घडले नेमके-
आला मेघदूत आला!

येता खलिता घेऊन
मेघ आपूल्या भेटीचा,
वेणी फणी करू देत
दारी अंथरा गालिचा..

तुज आवडे म्हणोनी
गच्च काजळ डोळ्यात,
जाई विराजली आहे
भुरभूरत्या केसात..

----------------------------------------

बोले दाटलेला मेघ
कान देऊन तू ऐक
"राजा दूरदेशी आहे
तुझी साथ नको आहे...!!"

एक क्षण, एक वीज
राख स्वप्न ते निर्मळ
कोमेजली जाई हाती,
डोळा भिजले काजळ

समजावे मी मनाला
कोण असे रे आपुला?
नसे जोर कुणावर
आहे जन्मची एकला....

आहे जन्मची एकला!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments