तुझ्या माझ्या आठवणींजवळ...

तुझ्या माझ्या आठवणींजवळ,
तूही रेंगाळून पहा ना....
भिंतींवरच्या पापुद्र्यांवर,
हात फिरवून पहा ना...

नव्हतंच का कधी काही
तू ही जपून ठेवावंसं,
जपलं असशीलच काही, तर
हलकेच उकलून पहा ना....

उष्ण उसासे, निसटलेले
अस्तित्वाला बिलगलेले
क्षणांचीच उब ती
आत जाणवून पहा ना..

हातांची हातांना घट्ट मिठी,
स्पर्शांचे स्पर्शाला होकार अन् नकार
थांबून जरा आज, ती
भाषा पडताळून पहा ना...

डोळ्यांच्या बाहूल्या,
पापण्यांचं लवणं,
कुठलीशी भावना
जपतच हसणं..
तुझ्या मनातलं हे बिंब
माझ्या डोळ्यांत पहा ना...

तुझ्या माझ्या आठवणींजवळ,
तूही रेंगाळून पहा ना....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments