तेच ते अन् तेच ते....

तेच डोळे,
तीच उघड-झाप,
तीच झोप
सकाळ तीच!

तेच घर
तीच बाग,
तेच अंगण
ऊनही तेच!

तेच ठिपके
रांगोळी तीच,
त्याच पायर्‍या
पावलं तीच!

तेच शरीर
रस्ता तोच,
तीच चाल
पोहोचण्याचं ठिकाण.... तेच!

चेहर्‍यांवरचे तेच चेहरे
ओळखीचे सारे,
खोटे पहारे,
तीच लगट अन तेच इशारे!

परतीची वाट तीच
ठरलेली कामंही तीच..
मागे पडणारा आज तोच
काल तोच
रोज........
तोच!

अंगावरली तीच कातडी,
बोटांनाही नखे तीच
जपलेले पंचद्रिये
त्यांनाही ठरलेली कामं तीच!

दिसामाजी मात्र चढत जाणार्‍या सुरकुत्या,
लोंबणारी त्वचा..
थिजलेली दु:खं
अन् मुरलेली सुखं!
ह्यात नाविन्य मला गवसत नाही, अन्
तू म्हणतोस,

उगवणारा प्रत्येक दिवस नवा असतो!!

 - बागेश्री

Post a Comment

0 Comments