जरा जरासं.... जगायचं ठरवलंय!

आता ना मी,
बदलायचं ठरवलंय...
जरा जरासं जगायचं ठरवलंय!
राखून झाली
स्थितप्रज्ञ अवस्था
प्रवाहातल्या
दगडासारखी
घट्ट मुट्ट, रोवलेली
मातीमधे खोवलेली
मुक्या लाटा पेलणारी
ओशट शेवाळं झेलणारी
ह्या अवस्थेलाच
ओलांडायचं ठरवलंय,
जरा जरासं.... जगायचं ठरवलंय!
प्रवाहावर सोडलेलं
पान व्हावं म्हणतेय!
आता,
प्रवाहावर सोडलेलं
पान व्हावं म्हणतेय!
जपलेलं अढळपण
सोडावं म्हणतेय..
नको तमा,
दिशेची, उन्हाची
वार्‍याची, पावसाची
आड येत्या दगडांची आणि खुद्द
प्रवाहाची...!!
जमेल तसं वहावं म्हणतेय
कधी गिरकी,
कधी भिरकी
वाहता वाहता
हळूच डुबकी,
वाटी आलेलं फाटलेपण चालेल
पण
वहायचं ठरवलंय
जरा जरासं.... जगायचं ठरवलंय!

 -बागेश्री

Post a Comment

0 Comments