टिपूस....

मध्यरात्रीला दारावरच्या
टकटकीने झोपमोड झाली....

उंबर्‍याबाहेरच्या थेंबाने,
चौकशी केली...
आत येण्याची परवानगी विचारत,

"मी सूख आहे" म्हणाला...!

त्यासरशी,
गालावरच्या सुकलेल्या आसवांना,
मी हसताना पाहिलं!!

'आता साधारण थेंबही, हिला आशा दाखवतात'
असं उपरोधी हसणं....

मलाही अंगवळणीच पडलेल्या
हा गोष्टी सार्‍या..
हा थेंब मात्र रेटून उभा,
'येऊ ना?' विचारत...
मी ही नेटानं तो क्षण सावरला...'नको, तू बाहेरच अस' सांगितलं त्याला ठणकावून..

"अगं, पण तुझ्या लाडक्या पावसानं पाठवलंय मला.. आणि मी एकटा नाहीये,
अख्खी बरसात आहे सोबत... "

कधीतरी भेटून गेलेल्या, त्या टिपूसावर अविश्वास तरी दाखवू कसा?

पण, हे सारे क्षणांचेच सोबती, नाही का?
पुन्हा गालांवरून वाहताना, हयाच टिपूसांचं रंग- रूप बदललेलं असणार..

कोरड्या मनानं मी दार लाऊन घेतलं...

आत शांत पडून राहिले...

हळूवार थेंब पडत राहिले,
थेंबांचा मग पाऊस झाला,
अवेळीच आलेला....
आणि माझ्या दाराबाहेरच राहिलेला....

बाहेर सूख कोसळत होतं!
छतावरून पानांवर-
पानांवरून डबक्यात,
एका घनगर्भ लयीत..
आणि मी,

मी मात्र-
कोरडे डोळे मिटण्याच्या प्रयत्नात.......

-बागेश्री

Post a Comment

0 Comments