लख्ख....

अपूर्णतेच्या खिन्नतेने तळमळत,
जागलेल्या रात्री
चढत्या रात्रीने शहाणपण शिकवलं
खरं खोट्याची सीमा लख्ख केली...

मग नवी उमेद श्वासात भरून घेता आली,
खंतावणार्‍या गोष्टींमध्ये अडकून राहिलेला पाय अलगद सोडवता आला..
अशा खिन्नतेमुळे येणारी डोळ्यांवरची झापड, दूर सारता आली..
जगण्यातले पैलू, डोळसपणे बघता आले
कुठल्याही भावनांचा डोह आता दुरून पाहता येतो,
अशा भावनांत डुबकी मारून बाहेर आल्यानंतर,
अंगावरचे कपडे निथळेपर्यंतच त्याची ओल टिकते, ही अक्कल आली...
स्वतःहून अशी मारलेली उडी परवडते..
योग्य वेळी बाहेर येण्याचं भान राहतं,
पण म्हणून, कुणी ओलेच कपडे आणून दिले तर, ते न चढवण्याइतपत समजही आली...
ही सारी किमया त्या जागल्या रात्रींनी केली...

पुर्णत्वाच्या वेडापायी, निसटलेल्या क्षणांची भरपाई करण्याची ताकद, 'अपूर्णतेला स्वेछेने' स्वीकारण्याने दिली...
खरं नि खोट्याची सीमा लख्ख केली... लख्ख लख्ख केली..!

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. मदमजी माझी मराठी दुरुस्त नही । तुम्ही हिंदी वर translate करा। :-) :-)

    ReplyDelete