एक चिऊ... गोजिरवाणी!

मी तुळशीपाशी, लावता पणती एक,
अंगणी शेजीची येते चिमणी सुरेख

कसे गाल गुलाबी, कानी झुलती डूल
हातात बाहुली आणि जाईचे फूल...

अन् म्हणते करूनी गाल गोबरे मजला,
"पाहूनी मला का हसूच फुटते तुजला?"

तिज जवळी ओढूनी, सांगू पाहे मग मी,
"अगं बाळा, गोड तू सुंदर चपळ गं हरिणी,
अशी गोडच दिसशी, हळूच हसता तू गं,
तुज पाहून बाळा, हसू फुटे मजला गं"

ना कळते तिजला, परि हलविते मान,
बाहुलीस धरुनी तिथेच मांडी ठाण,
ही तिला भरविते काय पहा हे ध्यान,
म्हणे ऐक बाहूले, "करू तयारी छान!"

बाहुलीस सजविता, पाहे शांत मी बसूनी,
तिचे केस आवरते, फूल जाई गुंफूनी..
मग पावडर खोटे, तिट टिळाही देते
ह्रूदयास धरूनी "राणी माझी" म्हणते

म्हणे ऐक बाहुले, सुंदर तू ही दिसशी
जर हासता कोणी, तू ही खुदकन हसशी...

मी पाहता कौतुके, हळूच मज म्हणते ती
"कसे सगळेच हसले, बघ ना जरा हासता मी"

ती भुरकन जाते, आली तशीच उडूनी
अन् साठवते मी , आत-आत ती चिमणी,
मग मलाही वाटे, घ्यावे शिकून जरासे
हे तंत्र खुशीचे, आनंदाची गाणी...

अशी रोजच येते, चिऊ ही चिवचिवणारी
अन् गळ्यात पडते, "हसते का गं" म्हणूनी....

Post a Comment

0 Comments