काही अस्पर्श्य भावना...!

धुंदीत जगता जगता,
उरल्यात काही संवेदना,
अजूनही न अनुभवलेल्या... न स्पर्शिलेल्या!
वाटतंय आताशा घ्याव्यात जगून .... त्या
काही अस्पर्श्य भावना...!

असेलच ना नक्की काही-

आनंदाच्या पार पलिकडलं
दु:खाच्याही जरा अलिकडलं,
भितीच्या मग बरंच पुढचं
अन् उदासीच्याही आधीचं काही....?

पान्हा फुटण्या क्षणा भोवतालचं,
मायेच्या ओथंबत्या नजरे नंतरचं
कासावीस जीवाच्या आसपासचं,
बेपर्वा मिनीटांच्या पहिले काही....

असहाय्यतेच्या जरा आधीचं
हतबलतेच्या थोडं जवळचं
रुजणार्‍या आशेच्या सभोती
उणीवांच्या, भवताल काही...

जगताना जे जाणवलंच नाही,
निसटलेलं हे काही बाही,
उरलेल्या ह्या संवेदना,
अजूनही न अनुभवलेल्या...
वाटतंय आताशा घ्याव्यात जगून .... ह्या
काही अस्पर्श्य भावना...!

Post a Comment

1 Comments

  1. FABULOUS.
    The feelings no longer remain 'untouched'.
    Delicate emotions treated in due, delicate fashion.

    ReplyDelete