पत्रकथा: नाते तुझे नि माझे (पत्र क्र. 1.)

मित्रहो..
सुरू करते आहे एक पत्रकथा, म्हणजे एकमेकांना पत्रे लिहून उलगडणारी दोन व्यक्तिमत्त्वे व त्यांच्या भोवताल गुंफलेली कथा..

"नाते तुझे नि माझे"....

-बागेश्री
----------------

पत्र क्र. 1.

मानसी....!!!
चूक, बरोबर, योग्य, अयोग्य... ह्या सार्यांच्या पल्याड जाऊन हे पत्र...

हा आचरटपणा आहे?
असेल.
पण बाळबोधपणा नक्कीच नाही.

आज तू दिसलीस, इथे, माझ्या अपार्टमेंटमधे... नाहीच राहू शकत आहे मी तुझ्याशी संवाद न साधता.
काय वाटलं?
सगळ स्तब्ध झालं...
तू तूच आहेस का, ही खात्री करून घेण्यातच मिनीटं सरून गेली... मी तुझा पाठलाग केला नाही, पण मागोमाग येत गेलो, ती मिनीटं कमावली, जमवली, तू तूच आहेस का जाणून घेण्यासाठी...

तुझे खांद्यापर्यंतचे केस... घट्ट लपेटून घेतलेली साडी... ह्यातलं काहीही 'तू' असल्याची साक्ष नाही, पण ही तूच आहे, असा आतून ठाम आवाज.....

तुझ्या घराच्या गेट्जवळ येताच तू मैत्रिणीचा घेतलेला निरोप... वॉचमनशी तुझे निरोप देणे घेणे... तोच किनरा आवाज... आणि मला वाटणार्या शक्यतेचं खात्रीत झालेलं रुपांतर!

वयानुरूप जरा कृश दिसते आहेस.. पण तू "आहेस"
ते ही, माझ्याच अपार्टमेंट मध्ये... योगायोगावर अपरिमित विश्वास ठेवण्यास भाग पाडते आहेस

मला खरंच व्यक्त होता येत नाही आहे- ते काम तू उत्तम करशील...
मधले वर्ष जरासे सारून, हा संवाद पुढे नेशील?
अपेक्षा नाही ही, निव्वळ इच्छा!

तुझा,
अनुराग..

त्.टी: वॉचमनला विचारलं, तुझा लेटर बॉक्स नं. १२, तिथेच टाकतो आहे हे पत्र.
माझा २९
बाय द वे, टेक्सासमध्ये स्वागत आहे....

-----------------------------

(क्रमश:)

Post a Comment

0 Comments