....फक्त एकदाच!

आयुष्यावर आयुष्याने
बेसुमार बरसताना,
रक्ताने उंच उसळावे..
फक्त एकदाच!

रंगांनी त्वचेत जिरताना,
बेरंग भावना रंगताना
मुसमूसून जगणे ल्यावे
फक्त एकदाच....

कानाचे गीत होताना
सुरांनी आत जिरताना
ताल शरिराचा ह्या व्हावा,
फक्त... एकदाच...

श्वासांनी गंधित होताना,
मिठीने घट्ट होताना,
अंतर मनांतले सरावे,
फक्त...एकदाच!

क्षणी कासाविस होताना
जगण्याला कोरड पडताना
आयुष्याने गार नीर व्हावे
......... एकदाच....!!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments