मन माझी जागा असुनी (उद्धव वृत्त)


मी मिटून डोळे घेता
ह्या मनात उन अवतरते,
तावदान मनभितींचे
रंगांनी उजळुन जाते

मनि छप्पा पाणी चाले
कवडसे लुकलूकणारे
जे हाती आले काही
ते निसटुन जाई सारे

रमणार कितीसा येथे
वेड्याश्या खेळामध्ये
अनवाणी चालू लागे
मी मूकाट उन्हामध्ये

हा मंद मंदसा वारा
मज उगा आवडू पाहे,
गुलमोहर रस्त्यावरचा
ह्या पायाखालुन वाहे...
का अशी शांतता मजला
कोठेही गवसत नाही
मन माझी जागा असुनी
नित परकी भासत राही

विभ्रम ते खोटे त्याचे,
खेळही खरा ना वाटे
का माझ्यामधल्या मजला
फुटले अगणित हे फाटे

-बागेश्री

Post a Comment

0 Comments