कर शिंपले तजेले...

डोळ्याच्या शिंपल्यात, स्वप्नाची रेघ
रात्रभर घरावर, रेंगाळता मेघ..
कधीतरी अनावर झाल्यावर
रिता रिता झालेला,
गळक्या छपरावरून पाऊस
थेट घरात आलेला..

एक थेंब त्याचा मग
शुभ्र शुभ्र शिंपल्यात,
मोती फुलला स्वप्नांचा
गच्च मिटल्या डोळ्यात..

किती उतला मातला
घन भावभोर झाला
त्याने जाग आली तुला
अन मोती निखळला

किती शोधशील त्याला
गेला वाहून जो गेला
त्याची साथ तेवढीशी
हेच सांग तू मनाला

घाल काजळ नव्याने
तुझ्या डबीतले ओले,
ओढ रेघ तू स्वप्नांची
कर शिंपले तजेले..

-बागेश्री

Post a Comment

0 Comments