तानाजी

...तो एकटाच होता, त्या रस्त्यावर! भरदूपारचं डांबर वितळवणाऱ्या उन्हात आणखी कुणी बाहेर असण्याची शक्यताही कमीच.
चढावर सायकल जड जाऊ लागली तसा तो पायउतार झाला, आता एका हाताने सायकलचं एक हँडल धरून मागे कॅरियरला लावलेला पत्रांचा गठ्ठा त्याने एकसारखा केला, उन्हाने रापलेल्या चेहऱ्यावरची घामाची धार निपटून काढली, सायकल रेटत चाल सुरूच होती, त्याच्या चपलांची करकर वगळता सारं निश्चल. मधूनच एखादी टिटवी वातावरणाची शांतता भेदत शांत होत होती. ओठांवरची कोरड जीभ फिरवूनही शमेना..
रस्त्याच्या उजव्या हाताला ठण्ण कोरडी पाणपोई, रांजणाला गुंडाळलेला लाल कपडा निस्तेज खाली गळून पडलेला, पाणपोईच्या त्या पत्र्याखाली दोन-चार पाखरं पाण्याचा थेंब शोधत गलका करणारी... 
आज खरेतर फक्त एका पत्रासाठी तो ह्या गावाकडे निघाला होता, म्हातारीमाय प्राण डोळ्यांत आणून नातवाच्या पत्राची वाट पहायची  आज पत्र आलं होतं, सोबत मनिऑर्डर होती, रणरण उन्हात तानाजी पत्र पोहोचवण्याचं कर्तव्य निभावत होता...
चढ संपला तशी त्याने सायकलवर पुन्हा टांग टाकली... एखादी झुळूक उन्हाची लाही जाणवून देत होती. मध्येच एकदा उतरून त्याने कळकट झालेला रूमाल काढून कानशिलांवर बांधला..
डांबरी रस्ता सोडून त्याची सायकल पायवाटेला लागली तो वाटेवरच्या मातीचा धुरळा उठला, डोळ्यांची उघड-झाप करत सायकल वेगाने निघाली..
            एखादी बैलगाडी आली की ह्याने पायउतार होऊन कडेला उभे राहावे, बैलगाडीने धुरळा करत जावे, ह्याने डोळे मिटावेत.. पुन्हा सवार होऊन सायकल मारावी...
ती म्हातारी ह्याची कोण होती? पण गावात हा गेला की वेशीजवळाची झोपडी म्हातारीचीच.. ह्याने हाळी ठोकली की तिने लडखडत येऊन नातवांच पत्र आलं का चौकशी करावी.. ह्याने नाही म्हटलं तरी त्याला पाणी पाजावं, गुळाचा खडा द्यावा... किती मरमर करत येतोस रे बाबा पत्र वाटायला म्हणावं, परगावी गेलेली नाती तानाजीमुळे कशी टिकून राहिलीत ते कौतुकानं सगळ्यां गावकऱ्यांना सांगावं, ती माया तानाजीला धरून ठेवत होती...
"माजा नातू नाही राहत बग माज्यापाशी, म्या इतकं राबून त्येला शिकवीलं, मायबाप गेले त्येचे देवाकडं, पन मी टिकले, नैतर त्येला मोटं कुनी केलं असतं तान्या? माजी शेती होती मोप, दोन माडीचं घर बी हुतं, ईकलं ना मी तान्या, त्येला परदेशात धाडलं......पन आता सय येइना रे त्येला माजी, एक सुदीक पत्र टाकीना"
            म्हातारीमाय तानाजीची वाट पाही, रोज निराशेने काहीबाही बोली, तानाजी पत्र वाटायला उठला की त्याला म्हणे.. "जरा झाडाखाली ते थांबावं तान्या इतकं उनाचं फिरशील तर मरशील उनानं, हे असलं उन लई वाइट, जप रं बाबा लेकरं बाळंवाला गडी ना तू"
आज तानाजी म्हातारीपेक्षा एक टक्का जास्तच खूष होता.. पत्र आणि मनिऑर्डर पाहून नातवाला अक्कल आलीये म्हणात धडपडीने निघाला होता...
वेस दिसायला लागली तसा त्याला अजूनच हुरूप आला... सायकल दुपटीनं निघाली.. तहानेनं कोरड पडल्या घशालाही म्हातारी पाणी पाजेल  म्हणून इर्षेने निघाला.....
झोपडीजवळची गर्दी पाहून काहीसा भांबावला, नको ते विचार मनाशी आले, अशी अचानक गर्दी कशी, म्हातारीला बरं आहे ना, एका क्षणात अनेक विचार,  हाताशी पत्र, मनिऑर्डर घट्ट धरत झोपडीजवळ गेला... 
तिरडी पाहताच कळवळला..!!
"आरं तान्या, केवडा उशीर केलास बाबा.. तुला बघायचं म्हनून म्हातारीनं आतापर्यंत प्रान धरून ठेवला होता की रं, तूच होतास पोरा तिला, दे, दे चल खांदा"
चुरगाळलेलं पत्र खिशात कोंबताना, पडवीत ठेवलेला पाण्याचा पेला अन गुळाचा खडा त्याला दिसला. 
...हुंदका आवरत त्यानं खांदा पुढे केला
-बागेश्री

Post a Comment

0 Comments