मृत्यूपत्र

टाचा घासत, ती गेली.
शेवटचा पाण्याचा घोट मिळाला असता तर तडफडणारा जीव जरा शांतपणे गेला असता...
तिला नुकत्याच दिवंगत पतीचे बोल आठवत असावेत... "पाण्याचा घोटही कुणाकडे मागायचा नाही आपण,  जो आधी जाईल त्याला मागे उरलेला पाणी देईल..."
तिला विचारायचं होतं, 'मागे राहणार्‍याचं काय हो?' तिने तेव्हाही आवंढा गिळला होता आणि आता जीव जातानाही.

शेजारची मृणाल पहाटे पाचलाच बेल वाजवत होती, तिच्या लहानग्या लेकीला ह्या आजींकडे ठेऊन ती सत्यगणपतीच्या दर्शनाला निघणार होती, आजी पहाटेच उठतात तिला माहिती होतं पण त्या दरवाजा उघडेनात तेव्हा तिने तिच्याजवळ असलेल्या चावीने लॅच उघडलं

पाहीलं तर आजी निपचित, जमिनीवर.
अंग अजून गार पडलं नव्हतं... म्हणजे नुकताच जीव गेलाय.
आजीच्या हातात कसलासा कागद..
"देहदान"!

मृणालने नंबर फिरवला, कागदाच्या मागे असलेला त्यांचा रेजिस्ट्रेशन नं. सांगितला...

वाहिनी आली, देह घेऊन गेली...

संध्याकाळी मुलगी, दोन्ही मुलं आली, मृणालने चावी दिली...

मृत्युपत्र शोधण्यासाठी घराची उलथापालथ बराच वेळ सुरू राहिली..
मृणाल डोळे पुसत निघून गेली...

- बागेश्री
 

Post a Comment

1 Comments