मला दु:ख दे

मला दु:ख दे, दु:ख दे, दु:ख देवा
सुखाने जळावे असे दु:ख देवा

"किती काळ गेला, गळाभेट नाही"
असे भेटल्यावर म्हणे दु:ख देवा!

तुझ्याशी, जगाशी न जमले कधीही
उरे शेवटी एवढे दु:ख देवा

स्वत:ला पडावा विसर मीपणाचा
अशा ताकदीचे हवे दु:ख देवा

सुखाचे जिवाला बिलगणे सततचे,
मनाच्या तळाशी झुरे दु:ख देवा

जुनेरे विटूनी अता पार गेले
मला झाकण्या दे नवे दु:ख देवा

-बागेश्री

Post a Comment

0 Comments