पाऊस आणि ती

तू,
इंद्रधनुचे सप्तरंग ल्यालेला
मी नुसतीच 'गव्हाळ'
तू,
सगळ्यांवर वर्चस्व गाजवणारा
मी त्या सगळ्यातली एक
तू,
धुंद, शबनमी, निरागस,
मी फक्त आतुर

छे....! अगं
मी जर,
इंद्रधनुचे सप्तरंग ल्यालेला
तर तू
साज त्या रंगांचा!
मी जर,
सगळ्यांवर वर्चस्व गाजवणारा..
तर तू
ती ताकद माझी!
मी जर
धुंद, शबनमी, निरागस,
तर "तू"

जाऊ दे...
इतकं सहज आलं असतं सांगता,
तर युगानयुगे असा बेभान का बरसलो असतो??

-बागेश्री

Post a Comment

1 Comments