मसीहा

तू माझ्यातली संवेदनशीलता
पुन्हा मिळवून दिलीस,
जगताना हरवलेली..

जणू जत्रेतून,
वाऱ्यावर गोल फिरणारं चक्र घेऊन दिलंस,
मी धावतेय,
हात उंचावून...
आशेच्या नव्या वाऱ्यावर रंगीत चक्रही गरगरतंय..
माझ्यातला रुक्षपणा माझ्याच अनवाणी पायाखाली उडतोय,
धूळ होऊन!

कित्येक दिवसात असं मुक्त धावले नव्हते..
कपड्याचं भान नको,
रस्त्याचं नको, काट्याकुट्यांच नको...
दिशेची तमा नाही,
सुसाट धावणं...

डोळ्याच्या कडा आज जरा ओलसर,
कोरड्या गालांवर मृद्गंध फ़ुलतोय..
हृदयाची धडधड ऐकू येण्याइतपत
जिवंतपणा जाणवतोय...

गती थोडीही कमी न करता आता तुझ्या दिशेने निघालेय,
माझं असं रूप तुझ्या डोळ्यांत पहायचंय...
धाव थांबली तरी भिरभिरणारं रंगीत चक्र तुला दाखवायचंय...

जत्रा पांगली तर नसेल ना?

आता डोळ्यातनं जे खळतंय ते तुझ्यासाठीचं काही आहे....
ते न बघता जाणार नाहीस ना..

चमत्कारापूरती जीवनात येतात काही माणसं
तू त्यातला नाहीस ना

अजूनही थांबून आहेस ना?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments