तुझे इवले पाऊल

तुझे इवले पाऊल,
बाळा घरभर पडे..
घर अंगण सजले,
दारी अमृताचे सडे ||१||

तुझे इवले पाऊल
जाग आणतसे घरा,
तुझ्या टपोर्‍या डोळ्यांत
माझी सामावली धरा ||२||

तुझे इवले पाऊल,
आता शाळेलाही जाई,
पाटी-पुस्तक हातात
मागे पडली अंगाई ||३||

तुझे इवले पाऊल,
कसे भराभर वाढे,
नीती नियमांचे सुद्धा
त्याने गिरवले धडे ||४||

तुझे इवले पाऊल,
उच्चशिक्षणही ल्याले,
लागे अर्थार्जन करू
खरे स्वावलंबी झाले ||५||

तुझे इवले पाऊल,
हवा सोबती तयाला,
उभा जन्म सोबतीने
सप्तपदी जगण्याला ||६||

तुझे इवले पाऊल
जोडव्यांनी सजलेले,
कर संसार सुखाचा
फुलो स्वप्न जपलेले ||७||

तुझे इवले पाऊल,
आता कधी-मधे येते..
सार्‍या घराला स्पर्शूनी
हलकेच परतते ||८||

तुझे इवले पाऊल
फार फार आठवते,
सार्‍या आठवणी तुझ्या
पाणी पापणीला देते ||९||

तुझे इवले पाऊल
करी संसार मानाचा,
नाव राखी संस्कारांचे,
आब दोन्ही घराण्याचा ||१०||

तुझे इवले पाऊल
बाळा आता जडावले..
स्निग्धावल्या चित्तवृत्ती
अंग रेशमी जाहले ||११||

तुझे इवले पाऊल
आता रुप बदलते,
होता 'आई' तू तान्ह्याची
त्याला थोरपण येते ||१२||

-बागेश्री

Post a Comment

0 Comments