दो रास्ता

दिवसभर प्रवास करून दमलं भागलं शरीर,
शीणलेली गात्र सावरत,
मुक्कामाच्या जागी आलं, की विसावतं!
आधीच बाहेर अंधारून आल्याने,
पडलं की निजतं!

भल्या सकाळी पुन्हा निघायचं असतं
उजाडलेल्या नभाखाली मग अचानक
दो-रस्त्यांच दर्शन...

रात्रभर झालेला आराम कुठच्या कुठे जातो...

दोन्ही रस्ते खुणावणारे, हवेहवेसे....

मग हिशोब सुरू होतात,
काही बेरजा आनंद देतात,
कुठे भागाकार असतो...
हिशोबाअंती ज्या रस्त्याची बाकी मोठी तो निवडावा वाटतानाच,
व्यवहारी मन खंतावतं....
दुसर्‍या रस्त्याच्या काही वजाबाक्याच मोहक असतात....

भावना की व्यवहार, अशा दो- रस्त्यांना जोडणार्‍या कोनातच
मुक्कामाचं स्थान का असतं,
नेहमीच?

Bageshree

Post a Comment

0 Comments