दुवा

फिरून एखादा दुवा पुढ्यात येऊन उभा राहतो
कधी काळी फार दृढ असलेला,
आता ओशट झालेला..

क्षणभर वाटतही
जुन्या ओळखीनेे साद घालावी,
जे अस्पष्ट झालंय
ते गडद करावं..

पण ओशट धाग्याची खात्री कुणी द्यावी?

आता जगण्याने तुम्हालाही सावध केलेलं असतं
पाऊल कितपत उचलावं हे शिकवलेलं असतं

मग जमतं, उसणं हसू आणायला,
वेळ सहज मारून न्यायला,
"काय, इकडे कुठे" म्हणत
डोळ्यांतली ओळख लपवायला...

नजरेआड झाल्यावर
ओघळला डोळा टिपताना,
'जगणं जमलंय आपल्याला'
हा निर्वाळा देत
भविष्याकडे अजून दमदार पाऊल पडतं..

-बागेश्री

Post a Comment

0 Comments