भरती

उधाणलेल्या फ़ेसाळ लाटा
उसळत राहतात आतल्या आत..
अनादि अनंताची जीवघेणी ओढ त्यांच्या ठायी
पार करायचाय शरीराचा अडसर
ओलांडून जायचंय डोळ्यांतलं आकाश...

पण
आवेगाला येतो उमजून
अडसराचा भक्कमपणा..
अथांग मर्यादा..
मग फुटत राहतो आतल्या आत
वास्तवाच्या रुक्ष खडकांवर...
उडत राहतात शुभ्र ठिकर्‍या
चौफेर!!

अंगभर फ़ुलारून उरतो
असाध्याचा कोवळा शहारा..

सगळं असोशीने थोपवून ओहोटीची वाट पहात राहणं किती अवघड असतं, माहितीये?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments