निजलेलं गडद आकाश

तू कधी गाढ झोपी गेलेलं आकाश पाहिलंस?
दिवसभर प्रकाशाचे खेळ करून
सांजेचं रंगपटल,
चंद्राची पुसट कोर,
टिमटिम चांदणं, पोटाशी घेऊन
दुमडून निजलेलं आकाश?

फार सात्विक दिसतं अरे ते..
गहन!
सर्वांगाला गडद रंग माखलेलं
ते सौंदर्य बावनकशी!

नजर खेचून घेण्याचं सामर्थ्य त्यात,
कुठे रे आजन्म आपण वेगवेगळ्या हिशोबांत अडकून पडतो?
त्याचा पट बघ,
कामाचा आवाका बघ,
दिवसभराची दगदग बघ
आणि शेवटी असं निवांत होणं बघ...

आपल्या वागण्याची कीव यावी असं व्यापून राहतं ते आपल्यावर..

आपणही मग हळू हळू मोकळं होत जावं,
त्याच्या काळ्याशार रंगात आपले काळेभोर डोळे गुंतवावेत,
झरू द्यावेत....
कुणी कुणाचं असू नये तेव्हा!

स्वत:ला असा भेटून बघ एकदा

सकाळी निरभ्र आकाश मग तुझं गुपित दडवून गालातल्या गालात हसेल नक्की...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments