रसिका

कल्पनेच्या तरल प्रवाहात,
शब्दांचं लाघव खळाळत राहिलं तर,
फुलून येतील ना भोवताली
काव्याच्या उत्स्फुर्त ओळी?

भिरभिरतील त्यावर काही साहित्यीक मूल्ये
कदाचित आच्छादेल भुई, हिरव्यागार काफियांनी....!

तू सवडीने ह्या हिरवळीवर येशील तेव्हा
फांदी- फांदीवरून ऐकू येईल सृजनाचं कोेवळं कूजन..

मग तू विहरावंस निवांत...
जागोजागी उमलून आलेल्या सौंदर्याला तुझ्या नेमक्या नजरेने न्याहाळावंस अन्
निसटावी मंगल दाद तुझ्या तृप्त मनातून..
तुझ्या अनवाणी पावलांना लाभावा गारवा,
चित्ती रुजावा गंधित मारवा...

अलगद उचलून घेशीलच ना तू भावलेला आशय?
कुरवाळशील त्याचा पोरकेपणा..
तोही बिलगेल तुला तितक्याच तत्परतेने

रसिका, तुला माय- बाप म्हणतो, ते उगीच?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments