झोका

आयुष्याचा एक थेंब आताच मानेवर पडलाय
उतरतोय पाठीच्या सांधीतून ... हळूवार
लहान होत जातोय
जिरेल मणक्यात  कुठल्याही क्षणी
इतक्यात, सगळं आवरण्याची भाषा करू नकोस!

आता कुठे जगण्याला
त्याची माती सापडलीय!
अपूर्व फुलण्याची वाट त्याने बघतलीय
डोळ्यातली आस जरा थांबून बघ
इतक्यात, पाठ फिरवून जाऊ नकोस!

शेवटाच्या टोकाला नवी सुरूवात दिसतेय? 
ते टोक घट्ट पकड!
पाय जमिनीवर रेटून घे
आपल्याला उंच झोका घ्यायचाय!

-बागेश्री
        

Post a Comment

0 Comments