हितगूज

मुकाट उभ्या झाडाचं
तिला उगाच आकर्षण!

एका संध्याकाळी,
सगळ्यांची नजर चुकवून तिथे गेली
शांत उभी त्याखाली
समाधी लागली असावी दोघांची,
त्याची पाने स्तब्ध
हिचं मन!

तिने त्याच्या शेंडयावरून ओघळणारा अंधार पाहून घेतला,
चांदण्यात चकाकती पानं टिपून घेतली,
चुकार झुळूकेनिशी, अंग शहारून घेतलं
अबोल गारवा पांघरुन घेतला..!

घरातून शोधाशोध झाली
ही झाडाशी सापडली
"आज उल्कापात आहे, बघून येते" म्हणाली
घरातले निघून गेले.
ह्यांचं पुन्हा हितगूज सुरु झालं!

सकाळी ओंजळभर पारिजात घेऊन आली...
चेहरा फ़ुलांसारखाच फुललेला
डोळ्यांत शुभ्र चमक...

"आजोबा, चांदण्यांची फुले झाली" म्हणाली..

-बागेश्री

Post a Comment

0 Comments