समूद्र- किनारा

दाटून आलेल्या चांदणनभी,
एखादा लख्ख तारा टिमटिमत राहतो..

मनाचा अथांग समूद्र होतो आणि शरीराचा किनारा!

मोकळा वारा सुटतो
केस भुरभूरतात
पाऊलं रुततात
काळा गडद अंधार..

खारा वास नाकातून छातीत साठतो..
एक उष्ण उसासा,
नवा नितळ श्वास..
ओठांवर खारेपणा...
कानातून नाभीपर्यंत फक्त उग्र- कोवळी गाज...

असा नखशिखांत ओलावलेला किनारा...!

अंधारात मात्र अथांग समूद्राचा थांग लागण्याची सोय नसते,
मन आवडू लागतं

एक एक पदर सुट्टा होतो
किनार्यावर आदळणार्या प्रत्येक लाटेनिशी...!
मोकळी ओढणी तरंगतेय की आपण?
ह्यातील फरक न कळण्याइतपत हलकेपणा येतो..!
जडत्व नाहीच
न शरीराला.... न मनाला.....

मंद चांदवा...
त्याच्या उजेडात दिसतोय, तितकाच समूद्र आपला....!!

किनारा मात्र आता जाणवेणासा झालाय....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments