गावचा बापू

ती तशीच झोपडीच्या मुख्य वास्याशी उभी होती... कितीतरी वेळ...
कधीतरी पायातलं बळ सरल्यावर तशीच खाली बसली.
पाऊस लागला होता....!
अखंड पाझरत होता.
वेणीचे पेड उघडले होते, झोपडीत शिरणारा वारा मोकळ्या केसांत घुसमटून पलीकडे होत होता..
तिला कसलंच भान नव्हतं.
बाहेरच्या संततधारेकडे टक लाऊन बसली होती.
कौलावरून गळणार्‍या पागोळयांच्या, पावसाच्या धूसर पडद्यापलीकडे तिची नजर पोहोचली होती.
अगंणात कधीच चिखल झाला होता.
दाराच्या चौकटीला गुडघ्याच्या उंचीची लाकडाची एक पाटी तिने लावली होती, म्हणून पाणी अजून तरी आत शिरलं नव्हतं!
झोपडीत तिच्या डाव्या हाताला, एकावर एक पितळेचे चार हंडे , त्याच्या बाजूला जर्मनचे काही मोठे पातेले उपडे ठेवलेले होते. सारवलेल्या चूलीत राख भुरभूरत होती. चूलीच्या बाजूला एका दुरडीत सकाळी थापून ठेवलेल्या एकसारख्या गोलाकार भाकर्‍या होत्या, त्याच्याबाजूच्या छोट्या पातेलीत कालवण शिजवून ठेवलं होतं!
चुलीच्या उजव्या बाजूला, झोपडीच्या कोपर्‍यात, एक मोरी होती. मोरीला असलेल्या कमरेएवढ्या भिंतीवर जर्मनच्या हंड्यात, वापरण्याचं पाणी भरून ठेवलेलं होतं. त्यात जर्मनचाच, चार ठिकाणी चेपलेला तांब्या गटांगळ्या खात होता.
मोरीपासून पलीकडेपर्यंत, झोपडीच्या दारापर्यंत, विटांचा उंचवटा करून त्याला सारवला होता. त्यावर पिण्याच्या पाण्याचा काळा माठ, चार जर्मनचे डबे, त्यात बर्‍यापैकी घराला पुरेल असं राशन भरून ठेवलं होतं!
तिच्या उजव्या हाताला एक शिडी होती, ती चढून गेल्यास वर माळा होता. एखादी ट्रंक, गाई- गुरांचा चारा तिथे साठवलेला होता.
ती ज्या वास्याला टेकून बसली होती त्यावरचा छोटा आरसा आत शिरणार्‍या हवेबरोबर झुलत होता... सार्‍या झोपडीचं प्रतिबिंब त्यात उमटत राहिलं होतं!
बाकी सारं स्तब्ध होतं..
तिच्या डोळ्यातली आणि बाहेर कोसळणारी अखंड सर एकमेकींशी स्पर्धा करत राहिली होती.
ह्यावर्षी पाऊस लागला होता, ह्यावर्षी झोपडी कुठेही गळत नव्हती.
झोपडीत शिरणार्‍या वार्‍याचे फटकारे चेहर्‍यावर बसत होते, केस सूटत मोकळे होत होते पण तिची तंद्री मोडली नव्हती.
मागचे सलग ३ वर्ष गावात दुष्काळ होता.
कर्जाने हैराण हणम्या शेतात झोपडीबाजूला विहीर खणण्याच्या तयारीत होता, हणम्यानं उरलं- सुरलं पणाला लाऊन शहरातून विहीर खणण्याचा परवाना आणला.भाऊकीचे वाद झाले. शेतावर दावा दाखल झाला. तिला कुंकू पुसण्याची धमकी मिळाली. भाऊच एकमेकांच्या जीवावर उठले. रक्त सांडलं. विहीर खणली गेलीच नाही.
निसर्ग खायला उठला की माणसंही जनावर होतात हा अनुभव तिनं जवळून घेतला..
झोपडीत अन्नाचा कण उरला नाही. पाण्याचा थेंब उरला नाही.
गावाचीच दूर्दशा झाली. लोक गाव सोडून जाऊ लागले.
बाकी उरलेले खोताच्या अंगणात जाऊन बसू लागले.
दिवसागणिक कर्जबाजारी होऊ लागले.
पाऊस येत नव्हता, पेरणी फोल जात होती.
हणम्या खोताची मदत घ्यायला तयार नव्हता.
खोत मदत करायला उत्सुक होता.
बापूची शाळा फी पायी बंद झाली होती.
रोजचं पिठाचं पाणी घशाखाली उतरत नव्हतं. लहानगा बापू खपाटीला पोट घेऊन घरात सुस्त पडून राहू लागलं.
तिनं खोताकडे शेत गहाण टाकण्याचा धोशा लावला. हणम्याला हातचं शेत जाऊ द्यायचं नव्हतं. विहीरीच्या नादापाई सगळं विकून टाकलं होतं, बी- बियाणं खरेदीला दमडी नव्हती.
हणम्या नको म्हणत असताही तिनं खोताकडे धाव घेतली होती.
खोत वात येईपर्यंत हसला.
हणम्याच्या भावकीनं खोताच्या बतावणीत येऊन कधीच शेत खोताला लाऊन पैसा केला होता.
हणम्या चवताळला.
पुन्हा वाद झाले...
ह्यावेळी खून पडला. मोठ्याने लहान्याला मारला. हणम्या भेदरला. लहान्याची बायको तांडव करु लागली, तसा मोठ्याने "चूकी छोट्याची व्हती, त्याला अक्कल नवती. अंगावर आला ईला घेऊन मी बी काय करनार, तू शांत व्हय,मी तुला सांभाळीन, तुज्या पोरांच बी करीन तू फकस्त मला तुरुंगात धाडू नगं, माझ्या संसाराचा ईस्कोट करु नगं," म्हणत निस्तरून घेतलं. हणम्याचा छोट्यावर खूप जीव, तो त्याच्या प्रेताशी सुन्न बसला. हणम्यावर खोटा आळ आणला. पोलिस त्याला तालुक्याच्या ठाण्यात घेऊन गेले, तिथून पुढे तो शहराच्या कोर्टात नेला गेला, हणम्याला फाशी होणार अशी बोंब उठली.
खोतानं डाव साधला.
हणम्याच्या पोराच्या शाळेची फी भरली गेली.
लहान झोपडी पाडून, मोठी केली गेली, मधोमध मजबूत वासा लागला, झोपडीत माळा आला, चार लहान- मोठी भांडी आली, राशन आलं.
"तुझं शेत भावकीच्या तावडीतून काढून तुला परत करतो, हणम्याला मी सोडवून आणतो, तोवर घरातल्या बायकांच्या हाताखाली काम कर, मी बोलवलं तेव्हा यायचं, रात्र- दिवस पहायचा नाही. तुला काही कमी पडणार नाही, ह्याचा जिम्मा माझा" ह्या बोलीवर घरात पै-पैका आला.
ह्यावर्षी दुष्काळ सरणार होता.
तिने खूप काही गमावलं होतं.
खूप काही कमावलं होतं.
तिचा हणम्या हकनाक गजाआड होता.
तिचा बापू शिकत होता.
तिच्या तरुण शरीराची कधीही मागणी होऊ लागली.
पडकं झोपडं जाऊन, डौलदार झोपडी आली.. घराला बळकट वासा आला.. पोटभर अन्न आलं.
घराच्या पाटीशी काही खडबडलं, तेव्हा ती भानावर आली.
खोत धोतराला सांभाळत झोपडीत शिरण्याच्या प्रयत्नात होता, पिऊन तर्र झाल्याने त्याला त्याचा तोल सांभाळता येत नव्हता. त्याच्यासोबत आलेल्या गडीमाणसांना तो झोपडीपासून दूर रहायला बजावत होता. 
संधी साधून तिने माळावरच्या शिडीकडे धाव घेतली. तिथे पालथी पडून राहिली.
खोताने शोधाशोध केली, तोंडाचा पट्टा सुरूच होता, शरीराची गरज पुरवायला पाहिजे तेव्हा बाई नाही म्हणून चिडला होता.
तितक्यात शाळेतून बापू आला.
खोताला आपल्या घरी पाहून भडकला. काय काम आहे म्हणून अरेरावीने विचारु लागला, तशी खोतानं त्याच्या गालात फडकावली.
माळावरती डोळ्याला धारा लागल्या.
"तुझ्या आवशीला सांग, पोराची शाळा सुरु ठेवायची असंल तर नेमानं घरी यायचं, नाहीतर ही झोपडी उठवायला मला वेळ लागणार नाही, दोन दिवस तिची चक्कर नाही तिकडे"
कसंबसं इतकं बोलून, तोल सावरत खोत आला तसा बाहेर पडला....
त्या दिवशी बापू मोठा झाला.
त्या दिवशी बापू उपाशी झोपला.

-बागेश्री
१२ फेब्रुवारी २०१५

Post a Comment

0 Comments