मनाच्या तळाशी, एक बंद दरवाजा!

मनाच्या तळाशी, एक बंद दरवाजा
त्यावर लोंबते आहे एक कडी.. गंजलेली
ते दार,
ठोठावलं गेलंय वर्षानूवर्ष!
आधी सतत
मग तासा- तासांनी,
नंतर महिन्यांतून एकदा,
मग अनेक वर्षांतून एखादवेळी.....
त्या कडीखालचा चट्टा केविलवाणा भासतो.

मनाच्या तळाशी, एक बंद दरवाजा!
त्याला कान नाहीत, त्याला मल्हार ऐकू येत नाही... 
त्याला दिसत नाही ओघळणारी, डोळ्यांतली असाह्य्यता!  
त्याच्या उंबर्‍याशी अनेक आर्जवं कोमेजली आहेत. 
तो तसाच ठाम उभा आहे... त्याच्या निर्णयाशी.
ठोठवला गेल्याली जखम लख्ख मिरवत!

मनाच्या तळाचा बंद दरवाजा..
अडगळीचा भाग आता
कडी बिचारी निपचीत आहे..
पलीकडे नव्हतीच हालचाल कधी
अलीकडली मंदावत आहे...
कुठे काही संपत आहे

मनाच्या तळाशी, एक बंद दरवाजा...!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments