बिन तेरे

काही गाणी इतक्या आर्त सुरावटीची असतात, की, त्याचं श्रेय शब्दांना, गायकीला की गीतकाराला द्यावं उमगत नाही. आजच्या काळातले उमदे संगीतकार 'विशाल- शेखर' शब्दांना सार्थ असं संगीत देत ह्या गाण्याला २०१० सालचं सर्वोत्तम गाणं म्हणून घवघवीत यशस्वी करतात...

हे गीत, आपल्याला बोट धरून त्याच्यासोबत घेऊन जातं आणि जगायला लावतं एका अस्वस्थ पोकळीत.

"बिन तेरे, कोई खलीश है हवाँओं में बिन तेरे!"

आयुष्यातली सगळ्यात प्रिय व्यक्ती. जी सोबत असताना दु:ख सहज झेलल्या जातात आणि नसण्याने सुख देखील रुततात. सारं काही असूनही अपूर्णतेचा भास होत राहतो. असं कुणी....
असं कुणी कुठल्यातरी कारणामुळे दूरावल्यावर त्या व्यक्तीची पावलोपावली भासत राहणारी उणीव, चित्रदर्शीपणे सांगणारं हे गीत.

"है क्या यो जे तेरे- मेरे दर्मियाँ है
अनदेखी -अनसुनी कोई दास्ताँ है....

अशा न सुटणार्‍या प्रश्नांचा पिंगा सुरू झाला, की मन सैरभैर होतंच.....
कुणाच्या असण्याला इतकं महत्त्व देऊन बसतो की नसणं मग पोखरत जातं..  
असं अनुभवनं जिवंतपणाचं लक्षण असावं, की खुळ्या भावनांचं? 
हा हिशोबही सारावाच बाजूला आणि त्या मिनिटाला वाट्याला आलेलं जगावं, ते आहे तसं, खूप सच्चेपणानं. 

"लगने लगी अब जिंदगी खाली, ये मेरी
लगने लगी हर सांस भी, खाली...."

असं रिकामपण अनुभवावं, अगदी ओतप्रोत अनुभवावं!
आपल्या आत केवढी पोकळी आहे, त्याचा एकदा पुरेपूर अंदाज घ्यावा. हाडामासाचं शरीर असूनही इतकं रिकामपण आत कसं? की श्वासांच्या अवरोहांचे पडासाद घुमत रहावेत..
घुमतच रहावेत..!!!

"अजनबीसें हुए क्यो ये पल सारे
के नजर से नजर ये मिलाते ही नही
इक घनी तनहाई छा रही है,
मंजीले रास्तों मे ही गुम होने लगी...

अशा प्रिय व्यक्तीचं कुठल्याही कारणाणं दुरावणं म्हणजे आयुष्याच्या हातातून आपला हात सुटल्याची भावना.
अतिशय सुयोग्य शब्दांत गीतकाराने शब्दबद्ध केली आहे अवस्था आणि तितक्याच बखूबीनं शफ्क्त अली आपल्या आर्त आवाजात हे पेश करत जातात तेव्हा अंगावर शहारा न आला तर नवल!

"हो गई अनकही हर दुआ अब मेरी
रह गई अनसूनी, बिन तेरे...."

त्याने परतून यावं म्हणून केलेली प्रत्येक प्रार्थना केवळ गाभार्‍यातल्या भिंतीवर आदळून हवेत विरत जाते.
प्रत्येक साद पोकळीत विरण्याचं दु:ख!
हवी असलेलीच व्यक्ती जीवनात नसल्याचं दुःख!
फक्त दोन ओळीतून मनातला भाव किती सकसपणे पोहोचवला आहे.

आता इथून शफ्कत अलीला, सुनीधी चौहान ओव्हरटेक करते...
गाण्याचा बाज सांभाळत, तो तिकडे एकटा असताना तिचीही काही फार वेगळी अवस्था नाही हे हळूवार पटवून देते, तिच्या खास आवाजात...

"राहमें रोशनी ने है क्यो हात छोडा, इस तरह शाम ने क्यो है अपना मुह मोडा
यू, के हर सुबह, एक बेरहमसी रात बन गई"

एखाद्या बंद तोडांच्या विहिरीत अडकलेल्या पाखराची अवस्था!
बाहेर पडण्याची अविरत धडापड, प्रकाशकिरण दिसल्याचा आभास. तिकडे घेतलेली झेप. आदळलेलं डोकं, पंख, चोच... आणि गरगरून आत आत पडत जाणारं गर्भगळित पाखरू!
खोल खोल पोकळी. पुन्हा धडपड...
पुन्हा कोसळणं! गर्भअंधारालाच मग पाखराने कवटाळत जाणं..
ती धडपड पहायला कुणी नाही, ह्या अंधारातून बाहेर काढायला कुणी नाही....!!

बिन तेरे...
बिन तेरे... बिन तेरे.....

एक अस्वस्थ लकेरीवर, दोघांच्या कोरसमध्ये हे गाणं संपतं तेव्हा, कुठलीशी निर्वात पोकळी आसपास जाणवत राहते... बराच वेळ...

असा प्रभाव मागे ठेवत गाणं संपणं हे त्या गीताचं, गीत घडवणा-या प्रत्येकाचं यश आहे... 

-बागेश्री

गाणं: बिन तेरे
मुव्ही: I hate love stories
कलाकारः सोनम कपूर, इम्रान खान
संगीतकारः विशाल शेखर
गायकः शफ्कत अली, सुनीधी चौहान

Post a Comment

0 Comments