एक शाम, जगजीत के नाम..

सुरूवात होते, 'कही दूर जब दिन ढल ज़ाए' गाणं  संपताना थेंब डोळ्यात तरळतो... तो, 'शामसे आंखमे नमीसी है' म्हणत जादूई आवाज संध्याकाळभर व्यापून राहतो...
                 एक एक नगमा अस्सल सोनं वाटत असताना 'एक प्यार का नगमा है' ची सुरेल सुरावट, कुठे तरी वहावत गेल्याची जाणिव... नजर गुंतून जाते, तिथेच रेंगाळते... 'ये नयन डरे डरे' म्हणत जगजीत अगदीच ग्लानीतून बाहेर आणतो आणि 'प्यार का पहला खत लिखनेमें, वक्त तो लगता है'  म्हणत बोटाला धरून गतकाळातून फिरवून आणतो... आवाजातलं स्थैर्य, धीर गंभीरपणा, उमदे भाव हेच उरतं.... हेच हेच उरतं...

'मिलकर जुदा हुए तो रोया करेंगे हम' कुणासाठी आपण, आपल्यासाठी कुणी कायमसाठी असावं ही भावना कशी गच्च दाटून राहते, गाणं संपलं तरी हुरहूर मागे ठेवत...

तो जगजीत सिग्नेचर 'कल चौहदवीं की रात थी' उमटतं.. जरासा हसरा, खेळखर भाव देत, दाद घेत घेत एक एक शेर पेश होतो... लाख वेळा ऐकून पाठ असलेल्या गझलेला दर वेळेस दाद देण्याची देण्याची इच्छा होते.. होतेच! आवाज ओळखीचा असला की हाकेला पटकन ओ देतो आपण.. तसंच...

'मै हूँ तेरा तो नसीब अपना बना ले मुझको...' आणि
'एक पुराना मौसम लौटा... याद भरी पुरवाई भी, ऐसा तो कम होता है, वो भी है तनहाई भी।'

काय म्हणावं...

इथे गाण्यांची प्ले लिस्ट संपली आहे .. घरभर जगजीतजी व्यापून उरले आहेत..
दैवी आवाज... प्रत्येक भावनेला न्याय देणारे सूर आसपास आहेत...

त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.... त्यांच्यातल्या कलाकराला पुन्हःपुन्हा साष्टांग नमस्कार.. _/\_

खुप दिलं आहे तुमच्या आवाजाने... देत राहणार आहात...

-बागेश्री
16th Feb 2014

Post a Comment

0 Comments