निरर्थक

मी पाहिलं आहे स्वत:ला
बेवारस रस्त्यावर बेभान भटकताना
जाणिवेच्या पलीकडे,
निरूद्देश....
जगण्यातली निरर्थकता डोळ्यांत भरून
आयुष्याच्या कच्या रस्त्यावर,
दिशाहीन....
मनातल्या आशा- निराशेच्या खुर्च्या
रिकाम्या ओस पडलेल्या..
आणि तिथे कुणी वावरत असलेल्या खुणा
धूळीच्या पूटाखाली लपलेल्या...
मी पाहिलं आहे.
कोरडे अंगण
ओसरी मोकळी,
सुन्न माजघर अन
देवघराची खोली,
एकटेपणाची छपरावर जळमटे
आणि काजळी चढलेली निरांजन,
डगमगता वासा
आणि संपणारं पर्व...
मी पाहिलं आहे.
मला द्यायचा असतो हात
निरुद्देश भटकणा-या त्या मुसाफिराला,
त्याने समृद्ध जगलेल्या एका क्षणाची
शपथ घालून अर्थ द्यावा वाटतो जगण्याला!
वाटते द्यावी पुन्हा उजळून शमली निरांजन, आणि
घालावी शुभ शकूनाची रांगोळी सारवल्या अंगणात!!
पण;
त्या मुसाफिराला झालेली निर्थकतेची जाणीव
मला आमच्यातली दरी सांधू देतच नाही!
-बागेश्रीPost a Comment

0 Comments