खेळणं

एखादी आठवण
गच्च दाटून येते...
काळ्याकभिन्न मेघासारखी,
मनावरती पसरुन राहते!
विसरल्याचा आव मोडीत काढ़ते
ऐटीत आपला ताबा घेते

आता ती मालकीण, आपण एक खेळणं.
आता ती आठवणच मालकीण आणि आपण निर्जीव खेळणं...
डोळे मिट म्हटलं, मिटायचे
उघड म्हटलं, उघडायचे
माझ्यासोबत चल म्हटलं... निघायचं!

ती आपल्याला फिरवून आणेल
प्रत्येक ती जागा, जिथे पुन्हा कधीही न जाण्याची शपथ घेतलेली.

तिथे तिला येऊन भेटतील आणखी काही सख्या.
आणि त्या सार्‍यांत...
सार्‍यांत, आपण एकमेव खेळणं.

मग सुरू होईल खरा छळ,
आठवणींच्या मागण्या पुरवताना,
आपली वेडी धावपळ...

कुणाला आपण आधी रमायचो, त्या जागा हव्या असतील 
कुणी मागेल निरुदेश्श भटकणं!
कुणाला न माळलेला गजराच हवा असेल,
तर कुणी ताटकळलं असेल होकाराचा एक क्षण पुन्हा जगण्यासाठी.

कुणी मागेल सागराची धडकून परतलेली गाज
तर कुणी मागेल तुझ्यापुरता केलेला साग्रसंगीत साज..

कुणी मागेल हक्काचा, हळवा पावसाळा,
कुणी मागतील अबोलीच्या नाजूकश्या माळा

कुणाला हवा असेल, निसटता स्पर्श
कुणाला हवाय रक्तातला हर्ष

कुणी मागेल,
तुझा निघून जातानाचा अप्रिय क्षण,
आणि... आणि इथे खेळणंच विव्हळेल कदाचित...

आणि मग एकाएकी सार्‍या सोडून जातील.
आल्या तशा निघून जातील.
खेळण्याला सजीवतेचं भान देऊन, हवेतच विरुन जातील..
तेव्हा
दाटलेलं आभाळ कोसळेल.. वेड लागल्यागत

आणि राहिल कोसळत
आकाश निरभ्र होण्याची वाट पाहत...

-बागेश्री

Post a Comment

1 Comments