तू, मी आणि पाऊस

तुझ्या दमदार हातात हात घेतोस, तेव्हा
बाहेर तो कोसळत असतो!
ओंजळीला सवय झालेली असते
तुझ्या उबेची,
त्याच्या गारव्याची!
तुमच्या दोघांतले साम्य शोधण्यात, भेद मिटवण्यात,
अनेक पावसाळे सरलेत

आता तोही प्रौढ झालाय
तुझ्याइतकाच समजूतदारही!

एखाद्या संध्याकाळी तो
हळवासा कातर,
कोसळत राहतो
अनेक तास
कित्येक प्रहर...
मी मात्र आडोश्याला!
त्याला पाहत
काही साठवत..
कुठल्याशा बेचैन क्षणी मात्र बाहेर पडते
चालत राहते
आता तो, मी, अंधार आणि त्याचा समजूतदारपणा!

फुलं
पानं
झाडं
ओहोळ
डबकी
पागोळ्या
असा सगळीकडे तो
त्याची व्याप्ती अपार
त्याच्यात गुंतणं धोक्याचं!
पण तो असा सोबत करतो, तेव्हा कळतं
तो कधीच गुंतलाय.....
मीच विचार करतेय, वर्षानूवर्ष!

आणि एकाएकी तुमच्या दोघांतलं साम्य मला गवसतं,
आणि सर्वांत मोठा फरकही!

ते साम्य मी आहे!
तो फरक मी आहे...

तुम्हाला देता येतं,
माझी ओंजळ आखूड!

पण आता ठरलं!
एकदा भेटूया...
मोकळ्या आभाळाखाली
तो गोठलेला नसताना, घनघोर बरसत असताना...
तू मिटलेला नसताना, मुक्त बोलका असताना......

तेव्हा एकच कर!
तुझ्या थोरल्या ओंजळीतून माझ्या ओंजळीत
त्याचं दान घाल!

तुमच्यातला एकमेव फरक,
मला कायमचा पुसून टाकायचाय!!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments