वैराग्य नशीले होते

तुझ्या श्यामल रंगात एकरूप होता होता,
ॠतूनूसार, वेळेनूसार, कारणानूसार थोडक्यात तुझ्या आवडीनुसार रुपं धारण करत गेलेली मी...
कधी एकटीच असताना स्वत:शी बोलत बसल्यावर, असं करत जाण्याचं कारण चाचपडताना स्वत:चं वेगळेपण न उरल्याचं कळतं.
कळतं की उरलंय ते केवळ माझ्यातल्या 'वैराग्याने तुझी साजणी होत जाणं' आणि ते असं उमटतं.....
 
वैराग्य नशीले होते
कधी मेघ नभीचा होते
कधी रंग ऋतूंचा होते,
मी वणव्याच्या वैशाखी
झुळूक अबोली होते..
 
कधी जाग कळ्यांची होते
कधी रूप दवाचे होते,
मी हलका हलकासा
शिवरी कापूस होते..

कधी बिंब तुझेच होते
कधी सूर तुझाच होते,
मी एकरंग होताना
सावरी तुझीच होते...

कधी धुंद गारवा होते,
कधी श्वास मारवा होते
मी काळाला हरणारे,
वैराग्य नशीले होते..

कधी लाज दाटली होते
कधी गंधभारली होते,
मी जगता जगताना
साजणी जाहले होते..

-बागेश्री

Post a Comment

4 Comments

  1. खूप भावपूर्ण.कधी कधी शब्द गवसत नाहीत प्रतिक्रियेसाठी.

    ReplyDelete
  2. Only you can express such type of thought .... really great and ......

    ReplyDelete
  3. आभारी आहे दोस्तांनो

    ReplyDelete