लक्षी

तिने आरशात पहात गोंदलेल्या भागावर ठसठशीत कुंकू लावलं, त्याला गोलाकार आकार देताना डोळे डबडबत गेले, ते सरर्कन पुसत म्हणाली, "बाब्या, झोपडीचं दार गच लाऊन घे, इचारल्याबगैर कुणालाबी आत घ्यायचं न्हाई, काय?"
बाबू तत्परतेनं मान डोलवत म्हणाला "व्हय"
"दुपारच्याला भाकरी खाय, दिसभर अब्यास कर. येतू म्यां" म्हणत कापडात खर्डा- भाकरी बांधून लगबगीनं बाहेर पडली. धूळ माखून पांढ-या पडलेल्या, भेगाळल्या टाचेत बारीक खडे रुतून बसू लागले, ती तशीच झपाझप निघाली.

सध्या धरलेलं काम झोपडीपासून फार लांब नव्हतं.
फ्लायओव्हर दणक्यात उभा होत होता. सकाळपासून सगळे बिगारी कामगार आपापल्या कामांना जुंपले होते.  फ्लायओव्हरच्या खालच्या भागात सगळ्या कामगारांनी आणलेल्या भाक-यांच्या ढिगारा-यात स्वत:चही भाकरीचं बोचकं खुपसलं. आधीच उंच बांधलेली साडी आणखी वर कसली, टोपली उचलली, कामाला लागली.
अलिशान गाड्यांतून जाणारे लोक, फ्लायओव्हरच्या कामामुळे घ्याव्या लागणा-या डायवर्जनवर धसमुसत होते, कामाला पोहोचायला उशीर होतो, किती महीने हे बांधकाम, म्हणत ट्रैफिक जॅमला शिव्या घालत होते. शून्य नजरेने कामगारांना न्याहाळत होते. तिनेही अनेक नजरा झेलल्या, टोपलीतल्या सिमेंटमधून फ्लायओव्हरमधे चिनल्या. उन चढलं, रापल्या चेह-यावरून धारा गळत राहिल्या. भुकेने आतडी ओढली जाऊ लागली. कोरडया ओठांवरुन जीभ फिरवत दिवस मावळतीला लागला, आपोआप काम थांबवावं लागलं. सकाळी गेलेल्या गाड्या आता परत फिरू लागल्या, बांधकामामुळे घ्याव्या लागणा-या डायवर्जनवर चरफड़ू लागल्या. घरी पोहोचायला उशीर होतो, किती महीने हे बांधकाम, आज पोराला किमान पिझ्झा हटमधे तरी न्यायलाच हवं म्हणत ट्रैफिक जॅमला शिव्या घालू लागल्या.

तिने आज कॉन्ट्रेक्टरकडे पैसे मागितले
 "मला उद्याचे बी पैसे आज दे"
"ये बये, लै लाडाला आलीस. रोजचे रोज न्यायचे, अड्वान्स एक रुपैया मिळनार न्हाई"  कॉन्ट्रॅक्टर वसकला
"मला गरज हाये, मी खाडा करती काय? येतू उद्या बी"
बरीच हो- नाही झाली.
ती कामावर यायला हयगय करत नसायची, कॉन्ट्रेक्टरने उदार होत पैसे हाती टेकवले
"अन् हे बघ, हे नेहमी चालणार नाही. इथे कुणाजवळ बोलू नकोस" म्हणत तिचा हात सूचकपणे दाबला.
पैसे मिळताच ती निर्विकार चेह-याने पुलाखाली गेली, भाकरीचं बोचकं उचललं, तरातर निघाली.

भाकरीचा एक- एक तुकडा मोडून त्याला भरवत होती.
"लक्षे, तू काय खाल्ल मंग" तिचे फक्त डोळे डबडब. आतडी अजूनच कळवळली.
"आज पैसे आनलेत म्या, तुजी आजची दवाई हुईल"
"म्या खरं सांगतु लक्षे, म्या लै ढोसली नव्हती, साइकलबी बराबर हाणत व्हतो, कुनी टक्कर दिली आन आडवा जालो काई माइत न्हाई, जागा जालो तवा ह्ये डोसक्याला टाके, गवेरमेंटच्या हॉस्पितलात आलो म्हनूनच्यान बरं नैतर कूटून आनायचा पैका, बाबू काय महंतो, आला नै तो?"
"त्येची परिक्शा हाय. तुज्याशी बोलनार न्हाई म्हंतूया, तू प्यायाचं सोडत न्हाइस तेपरयंत"
"मी सोडली, पुन्ना हात बी लावायचा न्हाय"
ती फक्त हसली, तिला हे नवीन नव्हतं.

सिविल हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमधून बाहेर पडून, घरी जाताना मुलगा मोठा झाल्यानंतरची स्वप्न डोळ्यांत उतरली. पोरगं भुकेने कळवळत असेल ह्या ओढीनं झपाझप निघाली.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments