ओळखधून

तू ये रात्र पांघरुण
दरीदरीच्या सांदी पांदीतून
कोवळा पाला कुस्करु नकोस
प्राण्यांनाही भिववू नकोस
पेक्षा उडता येईल तर बघ
अल्लद होेता येईल तर बघ
तुला कुणाचा त्रास नाही
तुझा कुणाला त्रास नाही
तार्‍यांना गवसणी वगैरे घे आटोपून
उसवली स्वप्ने काढ निपटून
हळूवार उतर माझ्या अंगणात
इकडची तिकडे जाग नको
उतर अशी, अशी उतर

घडे अंगणी भेट आपली
सावलीला भिडे सावली
नजर तुझ्या पार जाईल
तुझ्यात रात्र गडद होईल
तुला वेळेचे भान असू दे
वास्तवाची जाण असू दे
मी करेन हट्ट सोबत येण्याचा
तुझ्या संगतीने जगण्याच्या
सांगशील तू दुनियादारी
डोळयांच्या घनदाट उंबरी
मी राहीन शोधत काहीतरी
नकोस मिटू, मिटू नको तू

परतीची येईल वेळ जेव्हा
उतरव रात्रीचे पांघरूण तेव्हा
तुझ्या खुणेचा हा पुरावा
सरत्या काळासवे उरावा
कधी पुन्हा भेटलोच तर
टाळलीस तू ओळख जर
येईन पुन्हा इथेच परतून
एक अनामिक ओढीतून
हळूच काढेन रात्र ठेवणीतून
होतीस आली कधी पांघरूण
तिच्यातल्या तुझ्या उबेतून
पटेल खुणेची ओळखधून

-बागेश्री

Post a Comment

0 Comments