भान

हेच का ते मी नुकतंच उपभोगलेलं शरीर?
ज्याची छाती ओघळली आहे, मांड्या बेढब झाल्या आहेत, मानेचा भाग काळा पडलाय वर्षानुवर्ष मंगळसूत्र वागवून...?
कसे दिसले नाहीत, काही क्षणापूर्वी डोक्यावरचे विरळ पांढरे केस आणि ढिले पडलेले दंड?

तिला झोप लागली आहे, तिचे डोळ्याखालचे वर्तुळंही स्वस्थ निजलीत.
आणि मी सुन्न होऊन निरखतो आहे एक बेढब शरीर!
आजही माझ्यातल्या पुरुषाला बेभान करण्याची ताकद हिच्यात आहे की माझ्या वासनेत?
हा विचार आताच कसा डोकवतो आहे?
स्कॉचचा असर कमी होतोय कळताच मी फ्रीजमधली बॉटल काढून टेबलवर ग्लास घेऊन बसतो आणि नजर पडते मुलांच्या हस-या फोटोंवर.
किती लहान होती ही पोरं तेव्हा आणि आता परदेशी शिक्षण घेत आहेत. त्याही स्थितीत अभिमानानं श्वास फुलून येतो, मी स्कॉचचा घोट घेतो आणि जाणवतं त्याच फोटोंत किती कृश होती ही?
किती खस्ता खाल्या ऐन तारुण्यात, माझ्या मूर्खपणामुळे माझी नोकरी गेली तेव्हा शिवणकाम करत असायची ही. तेव्हाही काही विशेष केल्याचा आव नव्हता, आताही ठरवून दिलेलं काम केल्यासारखं सारं आटोपून झोपी गेली आहे... तशीच!

मी बघतो आहे स्वस्थ झोपलेलं शरीर, ज्याला भान नाही स्वत:चं, ज्याला माझा एक व्यक्ती म्हणून विचार करण्याचा आवाकाच नव्हता, असं शरीर.
हिच्या अंगावर गळ्यात सोडलं तर एकही दागिना कसा नाही?
तिने वेळोवेळी विकलेले दागिने पुन्हा घडवून दिलेच नाहीत. मी देणार होतो, तिने हौस केली नाही, मुलांच्या शिक्षणासाठी ठेवा म्हणत राहिली

मी ग्लास पुन्हा भरतो
आणि निरखतो सावळे शांत ओठ आणि आठवतं ती कधी रडली का माझ्याजवळ? कुठे लपवलं सगळं?
जाणवतं ह्या ओठांनी अबोलपणे सारी कर्तव्य केली अगदी आता काही वेळापूर्वीपर्यंत. सकाळी उठून सांगत बसेल सुनांसाठी काय काय राखून ठेवलं आहे स्वत:च्या संसारातलं!

मी पुन्हा पुन्हा ग्लास भरून घेतो
निरखत राहतो गादीवर पडलेलं स्वच्छ नितळ मन!
आणि ओक्साबोक्षी रडू लागतो
तिच्या अंगावर पांघरून घालत शिरतो तिच्या कुशीत ती ही नकळत सामावून घेते मला, थोपटते.

माझ्यातली बेभान स्कॉच मला त्याच शरीराजवळ घेऊन जाते तेव्हा मी मिटत जातो एका नितळ मनात...

-बागेश्री

Post a Comment

7 Comments