पायरी

तुझ्या व्यथा- समस्यांची एक पायरी कर
दगडी पायरी..
तिच्यावर चढून पार पलीकडल्या कड्यावर जा
तिथून मोकळं आकाश दिसेल
उंच उडणारे पक्षी दिसतील
दूर विरणारं क्षितीज दिसेल
कधी सूर्यास्त पहा
कधी सूर्योदय
कधी पाऊस पहा
कधी मिट्ट अंधार
रानवारा श्वासात भरून घ्यायची सवय कर
स्वतःचच नाव पुकारून इको ऐक
तुझं हसणं तुला नवं भासेल
तुझं असणं तुला नवं भासेल
पुन्हा त्या पायरीवरच पाय ठेवत वास्तवात उतरून ये
दिवसातून एकदा तिथे जात जा
कधी ते तू ठरव
किती वेळ थांबावं, ते तू ठरव

हळूहळू त्या पायरीचेेच आभार मानू लागशील

-बागेश्री

Post a Comment

0 Comments