तुला जायचं असेल तर

तुला जायचं असेल तर
समूळ निघून जा
अंगा खांद्यावर,
नव्या पालवीवर
वाळल्या फांदीवर
कुठलीही खूण न ठेवता जा
सावरून घे
किना-याची लाट
लपालपता फेस
भूरभुरले केस
काठाशी आलेली
शिंपली घेऊन जा
हाताशी आलेली
गुपितं घेऊन जा
घेऊन जा
प्रत्येक आठवण
मंतरलेले
कित्येक क्षण
पुसट पुसट पाऊलखुणा ने
ओंजळीतलं पाऊसपाणी ने
लपेटलेली रात्र ने
उसवलेली गात्र ने
डोळ्यांतलं पाणी,
आठवणीतली गाणी
उनाड गप्पा
भीतीचा धप्पा
घेऊन जा ती संध्याकाळ
ती हुरहुर
नुसत्या चाहुलीने
पेटणारे काहूर
सारं सारं बांधून घे
तुझ्यासोबती सारं ने...
जायचंच असेल तर असा जा
पाटी कोरी करून जा
-बागेश्री

Post a Comment

0 Comments