संवेदना

माझं प्रत्येक पान उलटताना तू थबकतोस, न्याहाळतोस,
समजावून घेतोस हर एक स्वल्पविराम, पुर्णविराम आणि
मोकळ्या सोडलेल्या जागाही!
बदलत जातो तुझा चेहरा माझ्या प्रत्येक संवेदनेनीशी...
मी आश्चर्य करत राहते, की
कुठल्या देवाने तुला घडवलं असेल?
पुरेसा वेळ देऊन तुला दिलं असेल असं संवेदनशील मन
ज्यामुळे तू एखादं पान मुडपूनही ठेवतोस..
कारण विचारल्यावर सांगतोस, की
ह्या पानावरचे काही संदर्भ लागलेच नाहीत, प्रयत्न करूनही..
आणि पुढे जगता- जगता अर्थ लागतील तेव्हा पुन्हा इथे येऊन पानाचा हा मुडपा काढणार आहेस तू!
तेव्हा मला कळूनच येत नाही की मी खरी, तू खरा, ही संवेदना खरी, की हे सारंच खोटं?
 
कारण माणसांच्या राज्यात हे असं काही नसतं रे..!
 
-बागेश्री

Post a Comment

0 Comments